

वॉशिंग्टन : बांबू हे केवळ स्वस्त नाहीत, तर त्यात भूकंप-प्रतिरोधकतेचे उल्लेखनीय गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे. आता लोकांना भूकंपांपासून वाचवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. एप्रिल 2016 मध्ये इक्वाडोरमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, तेव्हा मांटा या किनारी शहराचे मोठे नुकसान झाले होते. तेथील ‘तारक्वी’ नावाचा गजबजलेला व्यावसायिक भाग पूर्णपणे जमीनदोस्त झाला होता. शहरातील रस्त्यांवर इमारतींच्या विटा आणि सिमेंटचा ढिगारा गिळंकृत करणारे खोल भेगांचे घाव झाले होते.
आज मांटा शहराची बरीच पुनर्बांधणी झाली आहे; पण त्या भूकंपाचा एक अनपेक्षित वारसा अजूनही दिसतो आहे. भूकंपाच्या वेळी शहराचे ‘ग््रााऊंड झिरो’ असलेल्या भागात, किनाऱ्याजवळ एक मासे बाजार बांबूच्या मंडपाखाली उभा आहे. तिथे पर्यटन माहिती केंद्र, एक रेस्टॉरंट आणि एक अग्निशमन केंद्र देखील आहे, जे सर्व बांबूपासून बनवलेले आहेत.
खरं तर, संपूर्ण शहरात आणि आजूबाजूच्या मनाबी प्रांतात, शेकडो पारंपरिक बांबूची घरे आजही उभी आहेत. इंटरनॅशनल बांबू अँड रॅटन ऑर्गनायझेशनचे प्रादेशिक संचालक पाब्लो जाकोमे एस्ट्रेल्या म्हणतात, ‘ती सर्व घरे भूकंपापूर्वी बांधलेली होती. ती तशीच उभी राहिली.‘दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियामध्ये हजारो वर्षांपासून बांबूचा उपयोग बांधकाम साहित्यासाठी केला जातो.
पण अलीकडेच, वाढत्या संशोधन आणि प्रयोगशाळेतील शॉक चाचण्यांद्वारे त्याच्या भूकंप-प्रतिरोधकतेची क्षमता अधिक प्रमाणात ओळखली जाऊ लागली आहे. अभियंते आणि वास्तुविशारद बांबूची तुलना स्टीलशी करतात. त्याची नैसर्गिक क्षमता भूकंपाचा सामना करण्यासाठी त्याला आदर्श बनवते. आज जगभरात, फिलिपिन्स ते पाकिस्तान ते इक्वाडोर पर्यंत, बांधकाम प्रकल्पांमध्ये या नैसर्गिक साहित्याचा वापर केला जात आहे. जाकोमे एस्ट्रेल्या सांगतात की, इक्वाडोरच्या किनाऱ्यावरील लोक बांबू तोडण्यासाठी त्रयोदशीच्या चंद्राची वाट पाहत असत आणि नंतर ते स्वच्छ आणि संरक्षित करण्यासाठी समुद्रात घेऊन जात असत.