

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील विविध खंडांमधील गोड्या पाण्याचा साठा अत्यंत चिंताजनक वेगाने कमी होत आहे. जागतिक बँकेने 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या एका सविस्तर अहवालात, गोड्या पाण्याचा हा साठा नेमका कुठे आणि का संपत आहे, याचे धक्कादायक चित्र मांडले आहे.
‘कॉन्टिनेंटल ड्राईंग’ म्हणजे मोठ्या भूभागावरील गोड्या पाण्याच्या उपलब्धतेत होणारी दीर्घकालीन घट. या अहवालानुसार, बर्फ वेगाने वितळणे, कायमस्वरूपी गोठलेली जमीन (पर्माफ्रॉस्ट) वितळणे, पाण्याचे बाष्पीभवन आणि भूगर्भातील पाण्याचा अतिउपसा यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. (यामध्ये ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका येथील बर्फाचा समावेश नाही). विविध खंडांमधून दरवर्षी अंदाजे 11.4 ट्रिलियन घनफूट (324 अब्ज घनमीटर) पाणी कमी होत आहे.
‘दर सेकंदाला आपण ऑलिम्पिक आकाराच्या चार स्विमिंग पूल इतके पाणी गमावत आहोत’, असे या अहवालाचे मुख्य लेखक फॅन झांग यांनी सांगितले. हे सर्व नष्ट झालेले गोडे पाणी अखेर समुद्रात जाते. त्यामुळे आता हिमनद्यांपेक्षाही खंडांवरील पाणी कमी होणे हे समुद्रपातळी वाढण्याचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. दरवर्षी गमावले जाणारे हे पाणी 28 कोटी लोकांची वार्षिक गरज भागवण्यासाठी पुरेसे आहे. हा अहवाल नासाच्या ‘ग्रेस’ मिशनच्या 22 वर्षांच्या डेटावर आधारित आहे. शास्त्रज्ञांनी उपग्रहाद्वारे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातील बदलांचा अभ्यास करून पाण्याचा साठा किती कमी झाला आहे, याचे मोजमाप केले आहे.
जागतिक बँकेच्या मते, पावसातून मिळणार्या एकूण वार्षिक पाण्याच्या 3 टक्के पाणी दरवर्षी खंडांमधून नष्ट होत आहे. कोरड्या आणि निम-कोरड्या प्रदेशांमध्ये हे प्रमाण 10 टक्क्यांपर्यंत जाते. यामुळे दक्षिण आशियासारख्या आधीच पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. ‘पाण्याची समस्या ही केवळ स्थानिक वाटत असली, तरी स्थानिक पातळीवरील टंचाई लवकरच राष्ट्रीय सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय आव्हान बनू शकते’, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. देशांनी वेळीच पाणी व्यवस्थापन आणि भूगर्भातील उपसा थांबवल्यास हा धोका कमी करता येईल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.