Earth's Mini Moon | पृथ्वीला मिळाला नवा तात्पुरता ‘मिनीमून’

जानेवारी २०२७ पर्यंत हा छोटा लघुग्रह घालणार पृथ्वीभोवती प्रदक्षिणा
Earth's Mini Moon |
Earth's Mini Moon | पृथ्वीला मिळाला नवा तात्पुरता ‘मिनीमून’
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : आपल्या पृथ्वीला आणि नेहमीच्या चंद्राला या सुट्ट्यांच्या हंगामात एका नव्या अंतराळ सोबत्याची साथ मिळाली आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत एक छोटा लघुग्रह अडकला असून, तो तात्पुरत्या स्वरूपात ‘मिनीमून’ बनून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याच्या वृत्ताला खगोलशास्त्रज्ञांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. '2026 QQ8' (२०२६ क्यूक्यू एट) असे नाव असलेला हा लघुग्रह जानेवारी २०२७ पर्यंत पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे.

अवघा ६ फूट आकाराचा ‘मिनीमून’

एप्रिल महिन्यात पृथ्वीने या मार्गस्थ होणाऱ्या अवकाशीय खडकाला आपल्या कक्षेत ओढून घेतले. हंगेरियन संशोधक ख्रिस्तियान सार्नेझकी यांनी ऑगस्टमध्ये याचे प्रथम निरीक्षण केले, तर आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेच्या (आयएयू) मायनर प्लॅनेट सेंटरने २९ ऑक्टोबर रोजी याची अधिकृत नोंद घेतली. या लघुग्रहाचा व्यास अवघा ६ फूट (२ मीटर) इतका लहान आहे. सध्या तो चंद्राच्या सरासरी अंतराच्या सुमारे १.५ पट दूर अंतरावरून पृथ्वीभोवती फिरत आहे.

पृथ्वीला कोणताही धोका नाही

'2026 QQ8' (२०२६ क्यूक्यू एट) हा 'एटन लघुग्रह' (एटन ॲस्टेरॉइड ) गटातील असून तो दर १० वर्षांनी पृथ्वीच्या जवळून जातो आणि सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्याला ३५९ दिवस लागतात. जरी तो पृथ्वीच्या वातावरणात शिरला तरी आकाराने अत्यंत लहान असल्यामुळे हवेतच जळून खाक होईल, त्यामुळे पृथ्वीला याच्यापासून कोणताही धोका नसल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

नव्या दुर्बिणींमुळे वाढणार मिनीमूनचा शोध

यापूर्वी १९९१ मध्ये '1991 VG' हा पहिला मिनीमून शोधला गेला होता. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवर कोणत्याही वेळी किमान एकतरी मिनीमून अस्तित्वात असतोच.

चिलीमध्ये सुरू झालेल्या ‘व्हेरा सी. रुबिन ऑब्झर्व्हेटरी’सारख्या अत्याधुनिक दुर्बिणींमुळे आगामी काळात पृथ्वीच्या कक्षेत येणाऱ्या अशा अनेक लहान पाहुण्यांचा शोध लावणे अधिक सोपे होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.