

वॉशिंग्टन : सुमारे ४ अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर ‘आरएनए’ मुळे जीवनाची सुरुवात झाली, तेव्हा ते फक्त लहान आणि साध्या रचना तयार करू शकत होते, असा वैज्ञानिकांचा प्रदीर्घ समज होता. मात्र, एका नव्या संशोधनाने हा समज मोडीत काढला आहे. निसर्गात आढळणारे आरएनए रेणू फिलामेंटस् (तंतू) आणि केजेस (पिंजरे) सारख्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या भौमितिक रचना देखील धारण करू शकतात, असे या संशोधनातून समोर आले आहे. या शोधामुळे, जीवनाच्या सुरुवातीलाच अशा क्लिष्ट रचना अस्तित्वात होत्या का, असा प्रश्न आता शास्त्रज्ञांना पडला आहे.
‘आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस’ या सिद्धांतानुसार, डीएनए आणि प्रोटीन (प्रथिने) वापरणाऱ्या आधुनिक सजीवांच्या आधी पृथ्वीवर आरएनए-आधारित सजीव अस्तित्वात होते. डीएनएचा ‘आण्विक चुलत भाऊ’ असलेला आरएनए, आजच्या आधुनिक पेशींमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतोे; परंतु तो प्राथमिक आनुवंशिक पदार्थ म्हणून काम करत नाही. याउलट, आदिम (सुरुवातीच्या) प्रजाती आनुवंशिक माहिती साठवण्यासाठी आणि एन्झाईम्स (उत्प्रेरक) म्हणून रासायनिक प्रक्रियांचा वेग वाढवण्यासाठी आरएनएचा वापर करत असत. कालांतराने रासायनिक प्रक्रियांसाठी प्रथिनांचा वापर वाढला. कारण, ते आरएनएच्या तुलनेत अधिक वैविध्यपूर्ण आकारात दुमडू (Fold) शकतात.
प्रथिने हे २० प्रकारच्या उपघटकांपासून (अमिनो आम्ल) बनलेली असतात आणि प्रत्येकाची रचना वेगळी असते. याउलट, आरएनए हा फक्त चार प्रकारच्या उपघटकांपासून (न्यूक्लिओटाइडस्) बनलेला असतो, ज्यांचे आकार सारखेच असतात. त्यामुळे शास्त्रज्ञांना आधी वाटायचे की, फक्त प्रथिनांमध्येच मोठ्या रचना तयार करण्याची विविधता आहे. परंतु, ‘बायोआर्काइव्ह’ या प्रीप्रिंट सर्व्हरवर १ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या एका नवीन शोधनिबंधाने हे सिद्ध केले आहे की-आरएनए मध्ये विविधता मर्यादित असली, तरी त्यांच्यातही मोठ्या आणि क्लिष्ट रचना तयार करण्याची क्षमता आहे. (नोंद : या संशोधनाचे अद्याप समवयस्क पुनरावलोकन म्हणजेच Peer-review झालेले नाही). तज्ज्ञांच्या मतानुसार, ‘‘आरएनए अशा गोष्टी करू शकतो ज्या आपण यापूर्वी कधीही पाहिलेल्या नाहीत,’’ असे या अभ्यासाचे सह-लेखक आणि चीनमधील सन यात-सेन विद्यापीठातील आरएनए जीवशास्त्रज्ञ लिन हुआंग यांनी सांगितले. ते म्हणाले, "हे संशोधन असे सुचवते की, जीवनाच्या उत्पत्तीच्या वेळी आरएनए सर्व प्रकारच्या आकारांमध्ये एकत्र येऊ शकत होते.’’