Eagle Hunting Baboon | २६ किलो वजनाच्या बबून माकडाची गरुडाकडून शिकार

आदिमानवावरही पक्ष्यांचे हल्ले होत असल्याचा अंदाज
Eagle Hunting Baboon |
Eagle Hunting Baboon | २६ किलो वजनाच्या बबून माकडाची गरुडाकडून शिकार
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : गरुड अत्यंत मोठ्या आकाराच्या प्राण्यांचीही शिकार करू शकतात, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. यात तब्बल ५८ पौंड (सुमारे २६ किलोग्रॅम) वजनाच्या एका बबून माकडाचाही समावेश आहे. आदिमानवाच्या काही प्रजाती आधुनिक मानवापेक्षा आकाराने लहान होत्या आणि त्यांचे वजनही या बबून माकडांच्या आसपास होते. त्यामुळे प्राचीन काळी आदिमानवावरही अशा शिकारी पक्ष्यांचे हल्ले होत असावेत का, असा प्रश्न संशोधकांनी उपस्थित केला आहे.

‘अमेरिकन जर्नल ऑफ बायोलॉजिकल अँथ्रोपोलॉजी’ या नियतकालिकात बुधवारी (१८ नोव्हेंबर) या संदर्भातील शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. आतापर्यंत असे मानले जात होते की, गरुड १३ किलोग्रॅमपेक्षा (२९ पौंड) अधिक वजनाच्या नरवानर गटातील प्राण्यांना (प्रायमेटस्‌) उचलू शकत नाहीत. मात्र, आफ्रिकेतील चाड देशाच्या सहारा वाळवंटात संशोधन करताना शास्त्रज्ञांना नवीन माहिती मिळाली. या भागात गरुडांनी अलीकडेच शिकार केलेल्या किमान नऊ प्रौढ बबून माकडांचे अवशेष संशोधकांना सापडले आहेत. या प्रदेशात ‘व्हेरोक्स ईगल’ (Aquila verreauxii) या प्रजातीचे गरुड आढळतात.

हे गरुड उंच कड्यांवरून (कधीकधी जोडीने) शिकार करतात आणि त्यांच्या नख्यांच्या पकडीचा व्यास १६ इंच (४० सेंटिमीटर) इतका मोठा असतो. बबून माकडांच्या हाडांवर गरुडांच्या नख्यांचे खोलवर उमटलेले ठसे शास्त्रज्ञांना आढळले आहेत. गरुडांनी या बबूनची शिकार करून त्यांना ठार मारले आणि त्यांच्या शरीराचे भाग आपल्या घरट्यात नेले, असे या ठशांवरून स्पष्ट होते. या माकडांचे सरासरी अंदाजे वजन ४९ पौंड (२२.२ किलोग्रॅम) इतके होते, तर त्यातील सर्वात मोठ्या बबूनचे वजन ५८ पौंड (२६ किलोग्रॅम) होते. हे वजन चिंपांझी आणि बोनोबो यांच्यापासून वेगळ्या झालेल्या सुरुवातीच्या काळातील लहान ‘होमिनिन’ (आदिमानव आणि त्यांचे जवळचे नातेवाईक) प्रजातींशी मिळतेजुळते आहे.

उदाहरणार्थ, सुमारे ३२ लाख वर्षांपूर्वी सध्याच्या इथिओपिया भागात वास्तव्य करणाऱ्या ‘ल्युसी’ (ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस) या आदिमानवाचे वजन सुमारे ६२ पौंड (२८ किलोग्रॅम) इतके होते. गरुड काही वेळा मृत प्राण्यांचे मांस खातात (स्कॅव्हेंजिंग), मात्र या बबून माकडांच्या बाबतीत तसे घडलेले दिसत नाही. हाडांवरील जखमांची तीव्रता पाहता, गरुडांनी आपल्या जीवघेण्या पकडीनेच या माकडांची शिकार केल्याचे स्पष्ट होते, असे संशोधकांनी या अभ्यासात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.