

वॉशिंग्टन : जगातील सर्वात प्राचीन पारमार्थिक ग्रंथ असलेल्या ऋग्वेदामध्ये परमेश्वराबाबत अतिशय सुंदर वाक्य आहे. ‘एकं सत विप्रा बहुधा वदन्ति’ असे त्यामध्ये म्हटले आहे. त्याचा अर्थ एकच परमसत्य किंवा परमेश्वर आहे, ज्याला ज्ञानी लोक वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. आता असेच काहीसे उत्तर टेस्ला, एक्स, स्टारलिंक आणि स्पेसएक्ससारख्या बड्या कंपन्यांचे सर्वेसर्वा असलेल्या एलन मस्क यांनी दिले आहे. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान मस्क यांना ‘तुम्ही देवावर विश्वास ठेवता का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. ज्याचं मस्क यांनी दिलेलं हे उत्तर अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेलं.
सहसा विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन अशा गोष्टींमध्ये रमणार्या मस्क यांनी मुलाखतीदरम्यान (विश्वाचा) ‘निर्माता’ आणि ब्रह्मांडाच्या उत्त्पत्तीसंदर्भात आपली मतं मांडली, एक वेगळा द़ृष्टिकोन ठेवला. देवावर तुमचा विश्वास आहे का, असा प्रश्न विचारला असता मस्क यांनी एकदमच अनपेक्षित उत्तर दिलं. ’माझ्या मते हे संपूर्ण ब्रह्मांड कोणा एका गोष्टीतून (सत्तेतून) तयार झालं आहे आणि लोक याच्यासाठी विविध नावांचा वापर करतात’, असं ते म्हणाले. ‘तुमचा सर्वाधिक विश्वास कोणावर आहे, तुम्ही कोणाला मानता?’, असा प्रश्न केला असता (सृष्टीच्या) ‘निर्मात्याला’ असं उत्तर त्यांनी दिलं. ‘देवाविषयी तुमचं मत काय?’ असा प्रश्न केला असता, ‘परमेश्वरच निर्माता आहे’, असं उत्तर देत मस्क यांनी सर्वांच्या नजरा वळवल्या. मुलाखतपर संवादादरम्यान मस्क यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती मतप्रदर्शन केलं.
‘तुम्ही कोणा अशा व्यक्तीला ओळखता, जो सर्वाधिक विनोदी व्यक्ती आहे आणि ज्यांचा तुम्ही आदर करता?’, असा प्रश्न केला असता मस्क म्हणाले, ‘प्रत्यक्ष जीवनात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड विनोदी व्यक्ती आहेत. त्यांची विनोदबुद्धी नैसर्गिक आहे. त्यांचा स्वभावच विनोदी आहे.’ चौफेर चर्चा करणार्या मस्क यांनी या कार्यक्रमात स्पेसएक्स कंपनीच्या मंगळ मोहिमेवरही भाष्य केलं. या मोहिमेत फक्त मंगळावर जाणं हा एकमेव हेतू नसून, शाश्वत ‘मल्टी प्लॅनेटरी’ तयार करणं हा मुख्य हेतू आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. सोप्या भाषेत म्हणावं तर एका ग्रहावर आपत्ती आल्यास दुसरा ग्रह तुमचा बचाव करू शकतो. दरम्यान स्टारशिपच्या या मोहिमेत कोणत्याच प्रकारच्या कृत्रिम बुद्धिमता अर्थात एआयचा वापर करण्यात आलेला नाही असंही मस्क यांनी स्पष्ट केलं.