

वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटिक्सच्या जगात आतापर्यंत मोठे आणि मानवासारखे दिसणारे रोबो पाहायला मिळत होते. मात्र, आता या क्षेत्रात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध ‘एआय’ कंपनी ‘हगिंग फेस’ने एक असा रोबो सादर केला आहे, जो आकारात एखाद्या लहान खेळण्यासारखा दिसतो; परंतु त्याची कामे मात्र मोठ्या रोबोंसारखी आहेत. बदकाचा आकार असलेल्या या रोबोचे नाव ‘मायक्रोडक’ असे ठेवण्यात आले आहे. हा रोबो बदकासारखा चालू तर शकतोच, शिवाय आपल्या चोचीच्या साहाय्याने स्वतःच्या वजनाइतके सामान उचलून नवीन कौशल्येही शिकू शकतो.
सुमारे ३९९ डॉलर्स (अंदाजे ३८,००० रुपये) किमतीत लाँच करण्यात आलेल्या या रोबोटची खास वैशिष्ट्ये अशी : ‘मायक्रोडक’ ची लांबी सुमारे २५ सेंटिमीटर असून, त्याचे वजन ८०० ग्रॅमपेक्षाही कमी आहे. ‘हगिंग फेस’च्या मते, संशोधक, डेव्हलपर्स आणि ‘फिजिकल एआय’मध्ये स्वारस्य असलेल्या लोकांसाठी एक परवडणारा पर्याय म्हणून हा रोबो सादर करण्यात आला आहे. वास्तविक, जगात काम करू शकणाऱ्या रोबोवर लोकांना कमी खर्चात प्रयोग करण्याची संधी देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
‘हगिंग फेस’चे सीईओ क्लेम डिलांग यांच्या माहितीनुसार, ‘मायक्रोडक’ हा एक ‘ओपन सोर्स’ रोबो आहे. याचा अर्थ लोक याच्या कार्यपद्धतीत स्वतःनुसार बदल करू शकतात. ‘रीइन्फोर्समेंट लर्निंग’च्या मदतीने याला नवीन कौशल्ये शिकवता येतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, वापरकर्ते आधी ‘मायक्रोडक’च्या एखाद्या नवीन कामाचे किंवा वर्तनाचे ‘सिम्युलेशन’मध्ये प्रशिक्षण देऊ शकतात. त्यानंतर त्या प्रशिक्षणाची चाचणी घेऊन तेच कार्य प्रत्यक्ष ‘मायक्रोडक’ रोबोमध्ये ट्रान्सफर करू शकतात. यासाठी कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट, सिम्युलेशन एन्व्हायर्नमेंट आणि रीइन्फोर्समेंट लर्निंग टूल्स ओपन सोर्स म्हणून उपलब्ध करून देत आहे.
‘मायक्रोडक’ आकाराने लहान असला, तरी त्यात अनेक प्रगत हार्डवेअर वापरण्यात आले आहेत. यामध्ये एकूण १५ मोटर्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय रोबोमध्ये एक लहान LiDAR सेन्सर, एक कॅमेरा आणि २ इनर्शियल मेजरमेंट युनिटस् (IMU) समाविष्ट आहेत. हे सेन्सर्स ‘मायक्रोडक’ला स्वतःची हालचाल समजून घेण्यास आणि शरीराचा समतोल राखण्यास मदत करतात. या रोबोचे बदकासारखे तोंड (चोच) फक्त दिसण्यासाठी नसून, ते एका ‘ग्रिपर’प्रमाणे काम करते. या चोचीच्या साहाय्याने ‘मायक्रोडक’ तब्बल ८०० ग्रॅमपर्यंत वजन सहज उचलू शकतो.