

नवी दिल्ली : यकृत हे शरीराचं प्रमुख फिल्टर आहे. ते रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढते. चुकीच्या जीवनशैलीमुळे ते चरबीने भरू लागतं आणि नंतर फॅटी लिव्हर किंवा सिरोसिससारखे आजार निर्माण होतात. आहारतज्ज्ञ सांगतात की, शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरोफिल, पॉलिफिनॉल्स आणि अँटिऑक्सिडंटस् मुबलक प्रमाणात असतात जे यकृतामधील घातक द्रव्ये बाहेर टाकतात. व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E आणि फ्लेव्होनॉईडस् लिव्हरच्या पेशींना बळकटी देतात. लिव्हर फायब्रोसिस व लिव्हर डॅमेजपासून वाचवतात.
या पानांचा नियमित आहारात समावेश केल्याने यकृताचे डिटॉक्सिफिकेशन नैसर्गिकरीत्या होतं आणि ऊर्जा टिकून राहते. शेवगा हृदयासाठीही गुणकारी आहे. शेवग्याची पानांची भाजी खाल्ल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते, अँटिऑक्सिडंटस् व अँटिइन्फ्लमेट्री गुणधर्म असतात जे कार्डिवास्कुलर सिस्टमला सुरळीत ठेवतात. अनेक संशोधनात हे आढळून आलं आहे की, शेवग्याची पानं एलडीएल कोलेस्ट्रॉल आटोक्यात आणतात जे नसांमध्ये घट्ट प्लाक जमा करतं. या पानांत कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे भरपूर काळासाठी पोट भरल्यासारखं वाटतं आणि लवकर भूक लागत नाही. ज्यामुळे तुम्ही अति खाण्यापासून वाचता व वजन कमी होतं.
डायबिटीज म्हणजेच मधुमेह ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे, पण शेवग्याच्या पानांमधील इन्सुलिनसारखं प्रोटीन रक्तातील साखरेची पातळी घटवण्यास मदत करतं. अनेक संशोधनांत सिद्ध झालंय की, ही पाने नियमित रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यामुळे इन्सुलिनची गरज कमी होण्यासही मदत होते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी ही पाने नैसर्गिक आधार ठरतात. बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटफुगी यांसारख्या समस्या आहारातील असंतुलनामुळे वाढतात. शेवग्याची पाने पोटातील वाईट जंतू नष्ट करतात आणि पचनक्रिया सुधारतात. रिकाम्या पोटी उकळून घेतलेले या पानांचे पाणी घेतल्यास पोट हलकं राहतं. जंतुनाशक आणि पाचक गुणधर्मामुळे दीर्घकाळापर्यंत पचनाशी निगडित विकार कमी होतात.