लंडन : संशोधकांनी एक नवी कॉम्प्युटर व्हिजन सिस्टीम विकसित केली आहे. तिच्या साहाय्याने भविष्यातील ड्रोन तसेच अन्य लष्करी रोबोंना द़ृश्यात्मकता कमी असताना किंवा दुर्गम वातावरणात लक्ष्याचा माग काढण्यासाठी मदत मिळेल. ही व्हिजन सिस्टीम मांजराच्या डोळ्यांपासून प्रेरित आहे, हे विशेष! या सिस्टीममुळे भविष्यातील ड्रोन आजूबाजूचा परिसर अधिक तीक्ष्ण नजरेने पाहू शकतील.
रोबो, ड्रोन्स, स्वयंचलित मोटारी आणि अन्य स्वयंचलित यंत्रणा अधिकाधिक एकसारख्या बनत आहेत. मात्र, या सर्वांमधील एक समस्या म्हणजे सर्वच प्रकारच्या वातावरणात किंवा स्थितीत समोरचे द़ृश्य स्पष्टपणे पाहण्यासाठी किंवा लक्ष्यभेद करण्यासाठी त्यांच्यासमोर आजही आव्हाने आहेत. उदाहरणार्थ, स्वयंचलित मोटारी मुसळधार पावसात किंवा दाट धुक्याच्या स्थितीत चांगली कामगिरी करू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे, अशा स्थितीत त्यांचे सेन्सर्स आणि कॅमेर्यांवर परिणाम होत असतो. आता संशोधकांनी अद्ययावत लेन्सेस म्हणजेच भिंग आणि सेन्सर्सच्या साहाय्याने ही नवी व्हिजन सिस्टीम विकसित केली आहे. एखाद्या वस्तूचा छडा लावणे व ती कोणती वस्तू आहे हे ओळखण्यासाठी ही सिस्टीम एखाद्या मांजराच्या डोळ्याप्रमाणे काम करते. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मांजरे ही दिवसाचा प्रकाश आणि रात्रीच्या अंधारातही उत्तम प्रकारे पाहू शकतात. दिवसा मांजराची बुब्बुळे ही उभ्या चकतीसारखी असतात. ती प्रकाश फिल्टर करून बाहेर सोडतात व एखाद्या वस्तूवर त्यांना फोकस करता येतो. रात्रीच्या अंधारात ही बुब्बुळे विस्तारतात. त्यामुळे ती अधिकाधिक प्रकाश आत घेऊ शकतात व त्यांना अंधारातील वस्तूही स्पष्ट दिसतात. अशीच यंत्रणा या नव्या सिस्टीममध्ये बनवलेली आहे. दक्षिण कोरियातील ग्वांगजू इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे प्राध्यापक यंग मिन साँग यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.