

नवी दिल्ली : ‘भरपूर पाणी प्या’ हे आपण नेहमी ऐकतो. पाणी आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवते, थकवा दूर करते आणि शरीराला नैसर्गिकरीत्या डिटॉक्स करण्यास मदत करते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेदेखील आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते? शरीरात पाण्याची कमतरता असणे जेवढे धोकादायक आहे, तेवढाच पाण्याचा अतिरिक्त वापर किंवा ओव्हरहायड्रेशन देखील धोकादायक ठरू शकतो. ज्या लोकांच्या शरीरात आधीपासून यकृत संबंधित समस्या आहेत, त्यांच्यासाठी हा धोका विशेषतः वाढतो.
जेव्हा एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त पाणी पिते किंवा शरीर गरजेपेक्षा जास्त पाणी धरून ठेवते, तेव्हा या स्थितीला ओव्हरहायड्रेशन म्हणतात. याच्या गंभीर रूपाला ‘वॉटर इन्टॉक्सिकेशन’ किंवा ‘वॉटर पॉयजनिंग’ असेही म्हणतात. या स्थिती दरम्यान शरीरातील इलेक्ट्रोलाईटस्चा समतोल झपाट्याने बिघडतो. ओव्हरहायड्रेशनमुळे होणारे परिणामः पेशी सुजायला लागतात, पेशींमध्ये पाणी भरते. रक्तात सोडियमची पातळी खूप कमी होते.
गंभीर स्थितीत मेंदूच्या सूज येण्याचा धोका. सामान्य आणि निरोगी व्यक्तीमध्ये अधिक पाणी थेट लिव्हरला नुकसान पोहोचवत नाही. कारण, पाणी फिल्टर करण्याचे मुख्य काम किडनी करते. परंतु, जर एखाद्या व्यक्तीला आधीपासून सिरोसिस, यकृताचा गंभीर आजार असेल, तर पाण्याचे अधिक सेवन शरीरात अतिरिक्त द्रव जमा करू शकते. यामुळे गुंतागुंत वाढते. दररोज 8 ग्लास पाणी पिणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे, असे मानणे पूर्णपणे चुकीचे आहे. शरीराला पाण्याची गरज हवामान, वय, आरोग्य आणि कामाच्या स्वरूपानुसार बदलत राहते.