

लंडन ः नशिबाचे चक्र कधी फिरेल याचा नेम नसतो. याचाच प्रत्यय इंग्लंडमधील नॉटिंगहॅम येथे राहणार्या 29 वर्षीय सोफी डाऊनिंगला आला आहे. एका कॉफी शॉपमधील तांत्रिक चुकीमुळे सोफी कागदोपत्री जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरली आहे. तिच्या कॉफी व्हाऊचरमध्ये तब्बल 63 क्वाड्रिलियन पौंडस्ची रक्कम जमा झाल्याचे दिसून आले. जी एलन मस्क यांच्या संपत्तीपेक्षाही कित्येक पटीने जास्त आहे. हे घडले कसे आणि हा नक्की प्रकार काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.
सोफीला नाताळनिमित्त ‘200 Degrees Coffee’ कॅफेचे 10 पौंडचे गिफ्ट व्हाऊचर मिळाले होते. अलीकडेच तिने या व्हाऊचरचा वापर करून ‘माचा लाटे’ खरेदी केली. बिल मिळाल्यावर तिला धक्काच बसला. कारण, बिलावर तिच्या कार्डमध्ये 63,000,000,000,000,000 (63 च्या पुढे 15 शून्य) पौंडस् शिल्लक असल्याचे दिसत होते. ही रक्कम जगातील बड्या उद्योगपतींच्या एकूण संपत्तीपेक्षाही अधिक आहे. हे पाहून तिच्या डोळ्यांवर तिला विश्वासच बसला नाही. हे कसे झाले याचाच विचार ती करू लागली. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार तांत्रिक बिघाडामुळे घडला. व्हाऊचर स्कॅन करताना त्यावरील रकमेऐवजी बारकोडचा नंबर सिस्टीममध्ये ‘बॅलन्स’ म्हणून गृहीत धरला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कॅफेमधील कर्मचारीही हा आकडा पाहून थक्क झाले. सोफीने गंमतीने म्हटले की, ‘मी इच्छिले तर संपूर्ण दुकान विकत घेऊ शकते; पण तांत्रिक चुकीमुळे ही रक्कम प्रत्यक्षात वापरता येणार नाही.’ त्यानंतर तिथल्या कर्मचार्यांनी ही सुटकेचा निःश्वास सोडला. सोफी जेव्हा ‘200 Degrees Coffee’ कॅफेमध्ये गेली, तेव्हा तिने आपले गिफ्ट कार्ड वापरले. बिल दिल्यावर काऊंटरवरील कर्मचारी आणि सोफी दोघेही अवाक् झाले. तांत्रिक घोळामुळे गिफ्ट कार्डचा बारकोड नंबरच थेट बॅलन्स म्हणून बिलावर छापून आला होता. सोफीने सोशल मीडियावर हे बिल शेअर करताच ती व्हायरल झाली. अनेकांनी गमतीने तिला ‘जगातील पहिली महिला क्वाड्रिलियनर’ असे संबोधले आहे.