

बीजिंग : चीनने जगाला विविध प्रकारच्या आजारास कारणीभूत असलेल्या विषाणूंची जणू देणगीच दिली आहे. त्याच चीन समुद्रात 1,700 प्रकारच्या विषाणूंचा समूह सापडला आहे. दक्षिण चीन समुद्राच्या खोल भागात फर्स्ट इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग््रााफीसह चीनच्या समुद्री संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञ ‘ड्रॅगन होल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका विशाल पाण्याखालील सिंकहोलचा अभ्यास करत आहेत. त्याच्या आत सापडलेले जग जितके भयावह आहे, तितकेच ते आकर्षकही आहे.
हा सिंकहोल जवळपास 1,000 फूट सरळ खाली उतरतो आणि तिथे अंधारलेले, ऑक्सिजनअभावी वातावरण आहे, जिथे बहुतांश सागरी जीव तग धरू शकत नाहीत. तरीसुद्धा संशोधक सांगतात की, हे टोकाचे वातावरण पूर्णपणे रिकामे नाही. या ब्ल्यू होलमधील थरांमध्ये विभागलेल्या पाण्याच्या अभ्यासातून दाट सूक्ष्मजीव समुदाय आढळले आहेत आणि त्याहूनही अधिक लक्षवेधी बाब म्हणजे डीएनए सिक्वेन्सिंगद्वारे सुमारे 1,700 प्रकारचे विषाणू (व्हायरल टाइप्स) ओळखले गेले आहेत, ज्यांपैकी अनेक सध्याच्या डेटाबेसमध्ये वर्गीकृतच नाहीत. हा शोध पृथ्वीवरील अत्यंत कठीण व लपलेल्या परिसंस्थांमध्ये जीवन आणि विषाणू कसे कार्य करतात याबद्दल नवे संकेत देत आहे.
ड्रॅगन होल हेच ब्ल्यू होलचे लोकप्रिय नाव आहे. हा दक्षिण चीन समुद्रातील एक प्रचंड सागरी सिंकहोल आहे. ब्ल्यू होल म्हणजे तीव उतार असलेल्या पाण्याखालील पोकळ्या, ज्या बहुतेक वेळा चुनखडीच्या भूभागात तयार होतात आणि नंतर समुद्रसपाटी वाढल्यानंतर पाण्याने भरतात. सामान्य समुद्रातील पाणी प्रवाह, वारे आणि तापमान बदलांमुळे सतत मिसळत असते; पण ड्रॅगन होलची रचना अशी आहे की, पाण्याचा प्रवाह मर्यादित राहतो. त्याच्या तीव भिंती आणि अरुंद मुखामुळे पृष्ठभागावरील पाणी आणि खोल थरांमधील पाण्याची देवाणघेवाण कमी होते. यामुळे सिंकहोलच्या आत तीव स्तरनिर्मिती होते, जणू काही वेगवेगळ्या रासायनिक गुणधर्मांचे ‘थर’ एकावर एक रचलेले आहेत. एकदा ऑक्सिजनचा पुरवठा थांबला की खोल पाणी अडकलेले वातावरण बनते, जिथे विलक्षण सूक्ष्मजीव दीर्घकाळ टिकू शकतात.