

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील 18 दिवसांची मोहीम यशस्वी करून पृथ्वीवर परतले आहेत. त्यांच्या या यश संपादन करून सुखरूप परतण्याने केवळ त्यांच्या कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी डॉ. कामना शुक्ला यांनी एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला असून, त्या अंतराळातून कॉल स्वीकारणार्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी 25 जून रोजी ‘नासा’च्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटद्वारे ‘अॅक्सिओम-4’ मोहिमेंतर्गत ड्रॅगन ‘ग्रेस’ यानातून उड्डाण केले होते. 26 जून रोजी ते आपल्या सहकार्यांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आणि त्याच दिवशी त्यांनी थेट अंतराळातून पत्नी कामना यांना व्हिडीओ कॉल केला. या अविस्मरणीय क्षणाबद्दल बोलताना कामना म्हणाल्या, ‘त्यांचा आवाज ऐकणे आणि ते सुरक्षित आहेत हे कळणे, हेच माझ्यासाठी सर्वस्व होते.’ या कॉलदरम्यान शुभांशू यांनी त्यांना आपला दैनंदिन दिनक्रम, अंतराळ स्थानकावर सुरू असलेले वैज्ञानिक प्रयोग आणि अंतराळातून दिसणार्या पृथ्वीच्या विहंगम द़ृश्याबद्दल माहिती दिली.
कामना शुक्ला 25 जूनपासूनच अमेरिकेत होत्या आणि पतीच्या मोहिमेदरम्यान त्यांना मानसिक आधार देण्यासोबतच त्यांच्या पुनर्वसन आणि पृथ्वीवरील वातावरणाशी पुन्हा जुळवून घेण्याच्या प्रक्रियेची तयारी करत होत्या. 16 जुलै रोजी अमेरिकेतील ह्युस्टन येथे शुभांशू यांची पत्नी कामना आणि सहा वर्षांचा मुलगा कियाश यांच्याशी भेट झाली. हा क्षण अत्यंत भावुक होता. अंतराळ प्रवासापूर्वी दोन महिन्यांच्या क्वारंटाईन कालावधीमुळे त्यांना आपल्या कुटुंबापासून आठ मीटरचे अंतर राखून राहावे लागत होते.
या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या भेटीवेळी ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. ते म्हणाले, ‘अंतराळात उड्डाण करणे खूप अद्भुत आहे; पण इतक्या दिवसांनी आपल्या प्रियजनांना भेटणे हेदेखील तितकेच खास आहे.’ शुभांशू आणि कामना यांचे नाते खुप जुने आहे. लखनौच्या सिटी माँटेसरी स्कूलमध्ये तिसर्या इयत्तेपासून ते एकमेकांना ओळखत होते आणि 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले.
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे विंग कमांडर राकेश शर्मा (1984) यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाऊन विविध वैज्ञानिक प्रयोग करणारे ते पहिलेच भारतीय अंतराळवीर ठरले. तेच या मोहिमेचे पायलटही होते. आपल्या 18 दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी 60 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग यशस्वीरीत्या पार पाडले. यामध्ये त्यांनी अंतराळात मेथी आणि मुगाची यशस्वी लागवड करून दाखवली, जे भारताच्या अंतराळ संशोधनातील एक महत्त्वाचे आणि नवे पाऊल मानले जात आहे.