

एडिनबर्ग : ‘एआय’ मॉडेल्सना वेळ सांगता येत नाही किंवा कॅलेंडर वाचता येत नाही, असे एका अभ्यासात उघड झाले आहे. नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, बहुतेक माणसे सहजपणे करू शकणारी कामे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) करू शकत नाही - जसे की, अॅनालॉग घड्याळ वाचणे किंवा कोणत्या तारखेला कोणता दिवस आहे, हे शोधणे.
‘एआय’ कोड लिहू शकते, माणसांसारखे दिसणारे चित्र तयार करू शकते, मानवी भाषेसारखा मजकूर तयार करू शकते आणि परीक्षाही पास करू शकते, तरीही ते घड्याळाच्या काट्यांची स्थिती अचूकपणे ओळखू शकत नाही आणि कॅलेंडरच्या तारखांसाठी लागणारे मूलभूत गणित करण्यात अयशस्वी ठरते. संशोधकांनी हे अनपेक्षित दोष 2025 च्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन लर्निंग रिप्रेजेंटेशन्समध्ये एका सादरीकरणात उघड केले. त्यांनी एआरक्झिव्ह प्रीप्रिंट सर्व्हरवर त्यांचे निष्कर्ष प्रकाशित केले, त्यामुळे त्यांचे अद्याप पुनरावलोकन झालेले नाही.
बहुतेक लोक लहानपणापासूनच वेळ सांगू शकतात आणि कॅलेंडर वापरू शकतात; पण माणसे जी मूलभूत कौशल्ये सहजपणे करू शकतात, ती ‘एआय’ करू शकत नाही, हे आमच्या निष्कर्षातून दिसून येते, असे एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधक आणि अभ्यास लेखक रोहित सक्सेना यांनी सांगितले. जर ‘एआय’ प्रणाली वेळेनुसार चालणार्या वास्तविक जगातील अॅप्लिकेशन्समध्ये जसे की, शेड्युलिंग, ऑटोमेशन आणि सहायक तंत्रज्ञान, यशस्वीपणे समाकलित करायच्या असतील, तर या कमतरता दूर केल्या पाहिजेत.
‘एआय’च्या वेळेचे व्यवस्थापन करण्याच्या क्षमतेची तपासणी करण्यासाठी संशोधकांनी घड्याळ आणि कॅलेंडरच्या प्रतिमांचा एक सानुकूल डेटासेट विविध मल्टिमॉडल मोठ्या भाषा मॉडेल्समध्ये टाकला, जे व्हिज्युअल तसेच टेक्स्ट माहितीवर प्रक्रिया करू शकतात. अभ्यासात वापरलेल्या मॉडेल्समध्ये ‘मेटा’चे लामा 3.2-व्हिजन, ‘अँथार्पिक’चे क्लॉडे-3.5 सॉनेट, ‘गुगल’चे जेमिनी 2.0 आणि ‘ओपन एआय’चे जीपीटी 4.0 यांचा समावेश आहे. या मॉडेलचे निकाल निराशाजनक होते. कारण, मॉडेल अर्ध्याहून अधिक वेळा घड्याळाच्या प्रतिमेवरून योग्य वेळ किंवा दिलेल्या तारखेचा दिवस ओळखण्यात अयशस्वी ठरले.