Animal Protection | गाढवांना परिधान केले पायजमा आणि लेगिंग्ज!

Animal Protection |
Animal Protection | गाढवांना परिधान केले पायजमा आणि लेगिंग्ज!
Published on
Updated on

लंडन : उन्हाळ्याचा ऋतू हा फक्त माणसांसाठीच नाही, तर प्राण्यांसाठीही अनेक समस्या घेऊन येतो. ब्रिटनमध्ये तापमान वाढू लागताच चावणाऱ्या कीटकांची संख्याही झपाट्याने वाढू लागली. या कीटकांच्या हल्ल्यामुळे अनेक गाढवांच्या त्वचेवर जळजळ, खाज आणि वेदनादायक जखमा होऊ लागल्या. सिडमाऊथ येथील ‘द डॉन्की सँक्चुअरी’ मध्ये राहणाऱ्या आणि बचाव केलेल्या गाढवांसाठी ही समस्या अधिक गंभीर होती. विशेषतः जास्त वय असलेल्या गाढवांना कीटकांच्या चावण्याचा त्रास जास्त होतो, कारण त्यांची त्वचा लवकर बरी होत नाही. अशा वेळी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी एक अशी शक्कल लढवली, ज्याने गाढवांना तर आराम दिलाच; पण लोकांची मनेही जिंकून घेतली. गाढवांना कीटकांच्या चाव्यापासून वाचवण्यासाठी संस्थेने जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करण्यास सुरुवात केली आहे. आता सुमारे ४० गाढवांना सैल पायजमा, लेगिंग्ज आणि खास डिझाईन केलेले कपडे घातले जात आहेत.

हे कपडे गाढवांच्या शरीराच्या आकारानुसार बदलले जातात, जेणेकरून त्यांना चालण्या-फिरण्यात कोणताही त्रास होणार नाही. हे कपडे इतके आरामदायक ठेवले आहेत की गाढवे शेतात सहज फिरू शकतात, गवत खाऊ शकतात आणि नेहमीप्रमाणे राहू शकतात. पहिल्या नजरेत रंगीबेरंगी कपड्यांमधील गाढवांना पाहणे लोकांना खूप मजेशीर वाटत आहे; परंतु प्रत्यक्षात हे कपडे त्यांच्यासाठी सुरक्षा कवच म्हणून काम करत आहेत. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या कल्पनेपर्यंत पोहोचणे इतके सोपे नव्हते. सुरुवातीला त्यांनी गाढवांचे पाय झाकण्यासाठी मोजे घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गाढवे शेतात फिरत असताना मोजे वारंवार निघून जायचे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या आकाराच्या कपड्यांसह प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यांनी पायजमा, मॅटर्निटी ट्रान्झर्स आणि लेगिंग्जचा वापर सुरू केला.

हे कपडे अधिक उपयुक्त ठरले. कारण, ते एका जागी टिकून राहतात आणि प्राण्यांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण करत नाहीत. गाढवांसाठी बनवलेल्या काही विशेष कपड्यांना प्रेमाने 'डॉन-गेरी' असे नाव देण्यात आले आहे. हे नाव डॉन्की (गाढव) आणि डंगरी (कपड्यांचा प्रकार) एकत्र करून तयार केले आहे. हे विशेष कपडे प्रत्येक गाढवाच्या आकारानुसार तयार केले जातात. याचे कापड हलके आणि आरामदायक असते, ज्यामुळे कीटक थेट प्राण्यांच्या त्वचेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. संस्थेचे म्हणणे आहे की, हे कपडे स्प्रेपेक्षा अधिक प्रभावी ठरत आहेत. कीटकांना दूर ठेवणारे स्प्रे वारंवार मारावे लागतात, तर कपडे सतत संरक्षण देत राहतात. या उपक्रमाची सर्वात चांगली बाब म्हणजे यामुळे पर्यावरणालाही फायदा होत आहे. संस्था लोकांना आपले जुने सैल कपडे (जे आता वापरत नाहीत) दान करण्याचे आवाहन करत आहे. विशेषतः मोठ्या आकाराचे पायजमे, लेगिंग्ज आणि ट्रान्झर्स गाढवांसाठी खूप उपयुक्त ठरत आहेत. जे कपडे कचऱ्यात गेले असते, तेच आता मुक्या प्राण्यांचा त्रास कमी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news