Human Emotion : श्वान अचूक ओळखतात माणसाचे भाव

मेंदूच्या स्कॅनिंग संशोधनातून स्पष्ट
Human Emotion
श्वान अचूक ओळखतात माणसाचे भाव
Published on
Updated on

लंडन : कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू आणि संवेदनशील मित्र मानला जातो. मालक आनंदी आहे की दुःखी, हे कुत्र्यांना लगेच समजते, असा अनेक श्वानप्रेमींचा अनुभव असतो. आता या समजुतीवर विज्ञानानेही शिक्कामोर्तब केले आहे. ‘आयसायन्स’ या प्रसिद्ध वैज्ञानिक मासिकात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, कुत्रे माणसांच्या चेहऱ्यावरील आनंद, दुःख, राग आणि भीती यांसारखे विविध भाव स्पष्टपणे ओळखू शकतात.

ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठातील संशोधकांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. मानवाच्या विविध भावना पाहताना श्वानांचा मेंदू नेमकी कशी प्रक्रिया करतो, हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्यांच्या मेंदूचे एमआरआय स्कॅन केले.

मेंदूतील ‘रिवॉर्ड’ भाग सक्रिय

संशोधनादरम्यान आठ पाळीव श्वानांना (ज्यामध्ये बॉर्ड कॉलीज, लॅब्राडोर आणि गोल्डन रिट्रीव्हर यांचा समावेश होता) अनोळखी व्यक्तींच्या आनंदी आणि सर्वसामान्य (उदासीन) चेहऱ्यांची छायाचित्रे दाखवण्यात आली. जेव्हा श्वानांनी आनंदी चेहरे पाहिले, तेव्हा त्यांच्या मेंदूतील उच्च विचार प्रक्रिया आणि बक्षिसाशी संबंधित भाग म्हणजेच ‘टेम्पोरल कॉर्टेक्स’ आणि ‘कौडेट न्यूक्लियस’मध्ये विशेष हालचाली दिसून आल्या.

प्रमुख संशोधिका लॉरा कुआया यांच्या मते, ‘माणसांशी तुलना करता कुत्र्यांचा उत्क्रांतीचा मार्ग पूर्णपणे वेगळा राहिला आहे. तरीही मानवाच्या सहवासात राहून त्यांनी माणसाच्या भावना समजून घेण्याची आणि सहकार्य करण्याची सामाजिक क्षमता विकसित केली आहे.’

नकारात्मक भावनांवर मेंदूची वेगळी प्रतिक्रिया

संशोधकांनी पुढच्या टप्प्यात १२ श्वानांना आनंदी, रागीट, भीतीदायक आणि दुःखी चेहरे दाखवले. मशिन लर्निंगच्या साहाय्याने केलेल्या विश्लेषणात असे दिसून आले की, आनंदी चेहऱ्यांप्रमाणे राग किंवा दुःखावर कुत्र्यांचा मेंदू थेट प्रतिक्रिया देत नाही. परंतु, नकारात्मक भावना ओळखताना संपूर्ण मेंदूमध्ये एक विशिष्ट पॅटर्न सक्रिय होतो. संशोधक राऊल हर्नांडेझ-पेरेझ यांनी सांगितले की, ‘इतर प्रजातींमध्ये ‘कौडेट’ भाग हा अन्नाचे बक्षीस मिळण्याशी संबंधित असतो. मात्र, श्वानांमध्ये तो माणसांचे कौतुकास्पद शब्द आणि अनोळखी माणसाचा आनंदी चेहरा पाहूनही सकारात्मक प्रतिसाद देतो.’

प्रशिक्षणाद्वारे एमआरआय स्कॅनिंग

या प्रयोगासाठी श्वानांना कोणताही त्रास न देता, शांत बसण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. श्वान स्वतःच्या मर्जीने या प्रक्रियेत सहभागी झाले होते. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, कुत्रे केवळ चेहऱ्यावरूनच नव्हे, तर माणसाची देहबोली, आवाजाचा टोन आणि गंधावरूनही भावना ओळखतात. श्वान आपल्या भावना इतक्या बारकाईने टिपतात, त्यामुळे आपणही त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे, असा संदेश या संशोधनातून मिळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news