

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या कांगारू बेटावरील घनदाट जंगल, जागोजागी विषारी साप, भीषण उष्मा, काळजात धडकी भरवणारा 529 दिवसांचा संघर्ष आणि चमत्कारिकरीत्या जिवंत सापडलेली व्हॅलेरी. हे वर्णन एखाद्या व्हीआयपी व्यक्तीच्या शोध मोहिमेचे नाही. एका पाळीव कुत्रीच्या शोधासाठी तिच्या मालकांनी आणि बचाव पथकाने आशा न सोडता केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल.
कुत्रीचे मालक आणि बचाव पथकाने या घनदाट जंगलात तब्बल पाच हजार कि.मी. प्रवास केला आणि या मिनिएचर डॅशहाऊंड जातीच्या व्हॅलेरीला अखेर शोधून काढले. विशेष म्हणजे व्हॅलेरी जिवंत सापडली याचेच कौतुक या सर्वांना वाटले. या श्वानाला शोधण्यासाठी वन्यजीव बचाव पथकाने अनेक दिवस अथक परिश्रम घेतले. झाले असे की, नोव्हेंबर 2023 मध्ये, व्हॅलेरी ही कुत्री कॅम्पिंग ट्रिपवर आली असताना बेपत्ता झाली.
त्यामुळे प्राणपणाने तिचा सांभाळ करणारे जॉर्जिया गार्डनर आणि तिचा प्रियकर जोशुआ फिशलॉक कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी व्हॅलेरीला खेळण्यासाठी घराच्या आसपास असलेल्या मोकळ्या जागेत सोडले आणि दोघेही मासेमारीसाठी निघून गेले. दोघे जेव्हा परतले, तेव्हा व्हॅलेरी तिथे नव्हती. हे पाहून त्यांना धक्काच बसला. मग लगेच त्यांनी बचाव पथकाला पाचारण केले आणि तिचा शोध सुरू केला. अखेर अपेक्षा नसताना व्हॅलेरी जंगलात जिवंत स्थितीत सापडली, तेव्हा दोघांचाही जीव भांड्यात पडला. कांगला वाईल्डलाईफ रेस्क्यू टीमला त्यांनी मनोमन धन्यवाद दिले. आपल्या आवडत्या श्वानाला वाचविण्यासाठी या सर्वांनी घेतलेले श्रम आणि दाखविलेली चिकाटी हा ऑस्ट्रेलियात चर्चेचा अन् अर्थातच कौतुकाचा विषय बनला आहे.