

लंडन : पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विंचवाचा शोध जीवाश्मशास्त्रज्ञांनी लावला आहे. 'पॅलेंटोलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, 'प्रिआर्क्टुरस गिगॅस नावाचा हा विंचू सुमारे ४१.५ कोटी वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर वावरत होता. याचे पहिले जीवाश्म सन १८७० च्या दशकात सापडले होते; मात्र ते नक्की कोणाचे आहेत यावरून तेव्हापासून वाद सुरू होता. सीटी स्कॅन आणि पारंपरिक 'कॅमेरा ल्युसिडा' पद्धतीच्या रेखाटनांचा वापर करून संशोधकांनी आता निष्कर्ष काढला आहे की, हा एक प्रचंड मोठा अॅरॅकनिड (Arachnid - विंचू व कोळी वर्गातील प्राणी) होता. त्याच्या नांग्या ६.३ इंच लांब होत्या आणि संपूर्ण शरीराची लांबी सुमारे ३.३ फूट इतकी होती. विंचवाच्या बाबतीत विचार करता हा आकार अंगावर काटा आणणारा आहे!
ब्रिटनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे जीवाश्मशास्त्रज्ञ आणि प्रमुख संशोधक रिची हॉवर्ड म्हणाले, "प्रिआर्क्टुरस ज्या काळात राहत होता, तेव्हा जमिनीवरील सजीवसृष्टीची नुकतीच सुरुवात होत होती आणि सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी व पक्ष्यांचे पूर्वज अजून पाण्यातून बाहेर आले नव्हते." यावरून असे दिसून येते की, त्या वेळी इतर मोठे भक्षक प्राणी जवळपास नव्हतेच; त्यामुळे 'प्रिआर्क्टुरस गिगॅस'चे वर्चस्व राहू शकले. विंचवाच्या कौटुंबिक वृक्षातील त्याचे स्थान निश्चित करण्यासाठी संशोधकांनी या जीवाश्मांची तुलना कॅनडामध्ये सापडलेल्या प्राचीन विंचू Eramoscorpius च्या नमुन्यांशी केली.
हा महाकाय विंचू विचित्र आवाज काढण्यासाठी आजही वापरली जाणारी एक युक्ती वापरत असे. त्याच्या एका पायावर संशोधकांना खाचांची रचना (Ridge patterns) आढळली, ज्याद्वारे तो शरीराचे अवयव एकमेकांवर घासून आवाज काढत असे. या प्रक्रियेला स्ट्रिड्युलेशन म्हणतात. तसेच या प्राण्याच्या शरीरावर एपिमरा (Epimera) नावाच्या झडपेसारख्या संरचना होत्या, ज्या आजच्या कोळंबी आणि खेकड्यांमध्येही आढळतात. जमिनीवरील परिसंस्था पूर्णपणे विकसित झाली नसल्याने हा विंचू अनेकदा पाण्यातही जात असावा, असे संशोधकांना वाटते. किंबहुना, त्यांना आपले बहुतांश अन्न समुद्रातच मिळत असे. मात्र, लाखो वर्षांनंतर जेव्हा कारच्या आकाराची गोम (Millipedes) आणि शिकारी पक्ष्यांइतके मोठे ड्रॅगनफ्लाय जमिनीवर राज्य करू लागले, तेव्हा या विंचवांचा फायदा संपला. त्यांच्यात अन्नासाठी स्पर्धा सुरू झाली आणि अखेर ते नामशेष होण्यास कारणीभूत ठरले. तथापि, या जीवाश्मांच्या कालावधीनंतरही हे जीव आणखी सुमारे ४ कोटी वर्षे अस्तित्वात राहिले असावेत, असे शास्त्रज्ञांना वाटते.