Dodo Bird Research | डोडो पक्षी ‘मंदबुद्धी’ नव्हते : नवीन संशोधनातून मोठा खुलासा

अंधारात जगण्याची होती सवय
Dodo Bird Research |
Dodo Bird Research | डोडो पक्षी ‘मंदबुद्धी’ नव्हते : नवीन संशोधनातून मोठा खुलासा
Published on
Updated on

टोरांटो : इतिहासात नेहमीच ‘मंदबुद्धी’ आणि ‘अस्ताव्यस्त’ असा शिक्का बसलेला डोडो पक्षी प्रत्यक्षात बर्‍यापैकी हुशार होता आणि त्याचे आयुष्य बहुतांश अंधारात व्यतीत होत असावे, असा धक्कादायक खुलासा एका नवीन संशोधनातून झाला आहे. वैज्ञानिक अभ्यासादरम्यान डोडो पक्ष्यांच्या कवटीचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यात हे पक्षी मतिमंद असल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. मात्र, त्यांच्या मेंदूतील दृश्य प्रक्रियेसाठी जबाबदार असणारा भाग आकाराने लहान असल्याचे दिसून आले; जे सहसा निशाचर (अंधारात राहणाऱ्या) पक्ष्यांमध्ये पाहायला मिळते.

कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ लेथब्रिजमधील व्यवहार आणि उत्क्रांती विषयाच्या संशोधक व या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका सार्रा सिट्रॉन म्हणाल्या, ‘आमच्या निष्कर्षानुसार ही प्रजाती पाहण्याच्या क्षमतेवर (दृष्टीवर) फारशी अवलंबून नव्हती. माणूस केवळ अशाच परिस्थितीत दृष्टीवर अवलंबून राहत नाही, जेव्हा आसपास कोणताही प्रकाश उपलब्ध नसतो. म्हणजेच डोडो अंधारात जास्त सक्रिय असावेत.’ मॉरिशस या बेटावर १५९८ मध्ये मानवाने पाऊल ठेवल्यानंतर अवघ्या एका शतकाच्या आत डोडो पक्षी नामशेष झाले. डोडो हे मानवाला घाबरत नसत आणि संकटाच्या दिशेने धावत जात असत, यावरूनच त्यांच्या ‘मूर्खपणाची’ अफवा पसरली.

नाविकांना समजले होते की, जर एखादा डोडो संकटात असेल आणि ओरडत असेल, तर त्याचे आवाज ऐकून इतर डोडो त्याला वाचवण्यासाठी धावून येत असत. नाविकांनी या संवेदनशीलतेचा गैरफायदा घेत त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली. केवळ शिकारीमुळेच नव्हे, तर मानवाने सोबत आणलेले कुत्रे, मांजरी, डुकरे आणि उंदीर यांनी डोडोची अंडी खाऊन आणि त्यांना मारून या प्रजातीचा विनाश केला. ‘झूलॉजिकल जर्नल ऑफ द लिनियन सोसायटी’मध्ये ५ ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार डोडोच्या मेंदूचा आकार त्यांच्या शरीराच्या प्रमाणानुसार अगदी योग्य होता.

कबूतर आणि पारव्यांच्या प्रजातीतील इतर पक्ष्यांप्रमाणेच त्यांचा मेंदू विकसित झाला होता. २०२४ मधील एका अभ्यासात असे दिसून आले होते की, डोडो हे मंद किंवा सुस्त नसून अत्यंत जलद आणि शक्तिशाली होते. २०१६ मधील एका संशोधनानुसार, डोडो हे आजच्या आधुनिक कबुतरांइतकेच हुशार होते. ते कोडी सोडवू शकत असत आणि वेळ व जागेसारख्या संकल्पना समजून घेण्यास सक्षम होते. थोडक्यात सांगायचे तर, माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी एका अत्यंत दयाळू आणि हुशार पक्ष्याला नामशेष केले आणि इतिहासात त्यांनाच ‘मूर्ख’ म्हणून बदनाम केले!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news