

लंडन : शतकानुशतके ‘मूर्ख’ किंवा ‘अकार्यक्षम’ मानल्या गेलेल्या आणि नामशेष झालेल्या ‘डोडो’ पक्ष्याबाबत एक मोठा वैज्ञानिक खुलासा झाला आहे. डोडो पक्षी मंदबुद्धी नसून आधुनिक कबुतरांसारखाच हुशार होता, असा दावा ऑस्ट्रेलियाच्या फ्लिंडर्स युनिव्हर्सिटी आणि कॅनडाच्या लेथब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. संशोधनात अतिउच्च दर्जाच्या सीटीस्कॅनद्वारे डोडोच्या कवटीचे आणि मेंदूचे विश्लेषण करण्यात आले. निर्णयक्षमता व स्मरणाशी संबंधित त्याच्या मेंदूचा भाग इतर कबुतरांच्या मेंदूच्या प्रमाणातच होता.
मानवाची भीती का नव्हती?
मॉरिशस बेटावर डोडोचे मोठ्या प्रमाणावर अस्तित्व होेते. नैसर्गिक शिकारी नसल्यामुळे डोडो पक्षी निर्भय बनले होते. मानवाला पाहून न पळणे हा त्यांच्या अज्ञानाचा नव्हे, तर भीती नसण्याचा परिणाम होता. डोडोचे डोळे मोठे आणि दृष्टीशी संबंधित ऑप्टिक लोब लहान होते. त्यामुळे तो बहुदा पहाटे, संध्याकाळी किंवा रात्रीच्या अंधारात अन्नाचा शोध घेत असावा.
नामशेष झालेल्या डोडोचे पुनरुज्जीवन
१७ व्या शतकात मानवाच्या शिकारीमुळे नामशेष झालेल्या या पक्ष्याला ‘कोलॉसल बायोसायन्सेस’ या कंपनीद्वारे स्टेम सेल आणि जनुकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुन्हा जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०३० पर्यंत मॉरिशसच्या जंगलात नव्या डोडो पक्ष्यांना सोडण्याचे नियोजन आहे.