

लंडन : वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवत लंडनमधील एका सर्जनने तब्बल 1,500 मैल म्हणजेच 2,400 कि.मी. अंतरावर असलेल्या रुग्णावर यशस्वी ‘रिमोट रोबोटिक’ शस्त्रक्रिया केली आहे. ब्रिटनच्या वैद्यकीय इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून, यामुळे भविष्यात दुर्गम भागातील रुग्णांना घरबसल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळणे शक्य होणार आहे.
प्रसिद्ध रोबोटिक युरोलॉजिकल सर्जन प्रोफेसर प्रोकार दासगुप्ता यांनी जिब्राल्टरमधील 62 वर्षीय रुग्ण पॉल बक्स्टन यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली. प्रो. दासगुप्ता यांनी लंडनमधून रोबो नियंत्रित करून बक्स्टन यांची प्रोस्टेट ग्रंथीवरील शस्त्रक्रिया पूर्ण केली. या अनुभवाबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘शस्त्रक्रिया करताना मी प्रत्यक्ष तिथेच उपस्थित असल्यासारखे मला वाटत होते. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात रुग्णांना उपचारासाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही. जिब्राल्टरसारख्या ब्रिटिश ओव्हरसीज टेरिटरीमध्ये केवळ एकच रुग्णालय आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना गुंतागुंतीच्या उपचारांसाठी लंडनला जावे लागते. या यशस्वी प्रयोगानंतर आता दुर्गम भागातील लोकांना त्यांच्याच शहरात सर्वोत्तम सर्जनची सेवा मिळू शकेल.
पॉल बक्स्टन या रुग्णाने सांगितले, ‘जेव्हा मला अशा शस्त्रक्रियेसाठी विचारण्यात आले, तेव्हा मी त्वरित होकार दिला. वैद्यकीय इतिहासाचा भाग होण्याची ही संधी मी सोडली नाही. यामुळे मला उपचारांसाठी लंडनला जाऊन तीन आठवडे राहण्याचा त्रास वाचला.’ पॉल बक्स्टन यांची 11 फेब्रुवारी रोजी यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि आता ते पूर्णपणे बरे आहेत. या यशस्वी प्रयोगानंतर 4 मार्च रोजी दुसर्या एका 52 वर्षीय रुग्णावरही अशाच पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ‘द लंडन क्लिनिक’ आणि ‘जिब्राल्टर हेल्थ अथॉरिटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. या यशामुळे आता जगाच्या पाठीवर कुठेही बसून तज्ज्ञ डॉक्टर हजारो मैल लांब असलेल्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ठिकाण : सर्जन लंडनमध्ये होते, तर रुग्ण जिब्राल्टरमधील ‘सेंट बर्नार्ड’ रुग्णालयात होता.
तंत्रज्ञान : ही शस्त्रक्रिया ‘टुमाई रोबोटिक सिस्टम’द्वारे करण्यात आली.
कनेक्टिव्हिटी : लंडनमधील कंट्रोल युनिट आणि जिब्राल्टरमधील रोबोट फायबर-ऑप्टिक केबल्सनी जोडलेले होते. बॅकअपसाठी 5जी लिंकही उपलब्ध होती.
वेग : सिग्नल पोहोचण्यासाठी केवळ 0.06 सेकंद इतका कमी वेळ लागत होता, ज्यामुळे डॉक्टरांना रिअल-टाईम काम करता आले.