लंडन : ऑस्ट्रिच म्हणजेच शहामृग हे पक्षी आफ्रिका खंडात आढळतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक अधिवासात राहतात. त्यामध्ये गवताळ कुरणे, सॅवाना आणि वाळवंटी भागाचाही समावेश होतो. ते जगातील सर्वात मोठ्या आकाराचे पक्षी असून त्यांचे वजन 130 किलोपर्यंत असते. त्यांची उंची नऊ फुटांपर्यंतही असू शकते. त्यांच्या शरीराच्या तुलनेत डोके अतिशय लहान आकाराचे असते. अनेक वेळा त्यामुळेच त्यांच्याबाबत अनेक गैरसमज निर्माण होतात. त्यापैकी एक सर्वात मोठा गैरसमज म्हणजे शहामृग वाळूत आपले डोके पुरून उभे राहतात!
अनेक शतकांपासून हा गैरसमज सर्वसामान्य लोकांमध्ये पसरलेला आहे.‘बरी युअर हेड इन द सँड’ ही म्हणही इंग्रजीत आहे. ज्यावेळी एखाद्याला समोरच्या संकटाचा समोरासमोर सामना करता येत नसेल तर त्याबाबत ही म्हण वापरली जाते. अर्थातच असे काही शहामृगाबाबत घडत नाही. रोमन निसर्गतज्ज्ञ प्लिनी द एल्डर किंवा गैस प्लिनिअस सेकंदस याने या गैरसमजाला हातभार लावलेला आहे. सुरुवातीच्या काळातील एन्सायक्लोपिडियाच्या संग्रहाची निर्मिती त्याने केली होती. ‘द नॅचरल हिस्टरी’च्या दहाव्या पुस्तकात त्याने म्हटले आहे की शहामृग हा एक मूर्ख पक्षी असून तो स्वतःला लपवण्यासाठी आपले डोके झुडपात लपवतो व त्याला वाटते की आपण इतरांच्या नजरेतून अद़ृश्य झालो आहे! आपले भले मोठे शरीर दिसत आहे हे त्याला कळत नाही. शहामृगामध्ये अनेक चांगली वैशिष्ट्ये आहेत, तो काहीही खाल्लेले पचवू शकतो, पण त्याचा मूर्खपणाही लक्षणीय आहे, असे त्याने म्हटले होते. त्याच्या या शेर्याने शहामृग वाळूत आपले डोके लपवतो हा समज निर्माण झाला. खरे तर अन्य पक्ष्यांप्रमाणेच अनेक सवयी या पक्ष्यामध्येही आहेत. त्याचे डोके नेहमी जमीनीजवळ असते व त्याचे कारण खाद्य शोधणे हे आहे. त्यामध्ये गवतापासून ते उंदीर, बेडूक व लहानमोठे किडे यांचा समावेश असतो; मात्र घरटे बांधून अंडी घालणार्या अन्य पक्ष्यांच्या विपरित शहामृग हे वाळू किंवा मातीत छोटा खड्डा करून त्यामध्ये अंडी घालतात. नर व मादी दोघेही ही अंडी दिवसातून अनेक वेळा फिरवत असतात जेणेकरून त्यांना सर्व बाजूंनी उष्णता मिळावी. त्यांच्या या सवयींमुळे ते आपले डोके जमीनीत पुरत असल्याचा समज बनला!