

वॉशिंग्टन : तुमच्या ओळखीच्या प्रत्येक माणसाचे एक नाव असते आणि तुम्ही कदाचित तुमच्या पाळीव प्राण्यांनाही एखादे नाव दिले असेल. पण ‘नाव’ असणे ही केवळ मानवी संस्कृतीचीच खासियत आहे की इतर प्राणीही एकमेकांना विशिष्ट नावाने हाक मारतात? नवीन संशोधनानुसार, काही सस्तन प्राणी आणि पक्षी इतर सदस्यांना ओळखण्यासाठी विशिष्ट ध्वनींच्या किंवा हाकांच्या संकेतांचा वापर करतात. मात्र, या पुराव्यांचा कसा अर्थ लावावा यावर सर्व शास्त्रज्ञांचे एकमत नाही.
१९६० च्या दशकात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, लहान ‘बॉटलनोझ डॉल्फिन’ (Tursiops) स्वतःची एक वेगळी शिट्टी तयार करतात, ज्याला ‘सिग्नेचर व्हिसल’ म्हटले जाते. त्यानंतरच्या वर्षांत संशोधकांनी पाण्याखालील स्पीकरद्वारे या शिट्ट्यांचे आवाज वाजवून डॉल्फिनच्या प्रतिक्रियांचा अभ्यास केला. माणूस ज्याप्रमाणे नावाचा वापर करतो, अगदी तसेच डॉल्फिनही एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी इतर डॉल्फिनच्या ‘सिग्नेचर व्हिसल’ची नक्कल करतात. शिट्टीचा आवाज कोणत्याही डॉल्फिनचा असला, तरी त्या शिट्टीच्या वारंवारतेवरून आणि आकारावरून ते इतर सदस्याला ओळखू शकतात. फ्लोरिडामधील ‘डॉल्फिन रिसर्च सेंटर’च्या संज्ञानात्मक मानसोपचारशास्त्रज्ञ केली जॅकोला यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉल्फिन या शिट्ट्यांचा वापर इतर सदस्यांना ओळखण्यासाठी आणि एकमेकांशी सांकेतिक जोडणी करण्यासाठी करतात.
गुंतागुंतीच्या सामाजिक व्यवस्थांमध्ये आणि एकत्र काम करताना डॉल्फिन या शिट्ट्यांचा वापर करतात. ऑडिओ प्लेबॅक प्रयोगांद्वारे संशोधकांना असेही आढळले की, वन्य आफ्रिकन हत्ती एकमेकांशी संवाद साधताना विशिष्ट आवाजांचा वापर करतात. हे आवाज मांजर गुरगुरल्यासारखे खूप खोल आणि गंभीर असतात, जे प्रत्येक हत्तीसाठी वेगळे असतात. कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीचे व्यवहारशास्त्रज्ञ मायकेल पार्दो आणि त्यांच्या टीमने २०२३ मधील एका अभ्यासात हे निष्कर्ष मांडले आहेत. जेव्हा एखाद्या हत्तीचे ‘‘नाव’’ (विशिष्ट आवाज) स्पीकरवर वाजवले गेले, तेव्हा तो हत्ती त्या आवाजाच्या दिशेने वेगाने आला आणि त्याने प्रतिसादही दिला.
दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आढळणाऱ्या ‘स्पेक्टॅकल पॅराकीट’ (Spectacled parrotlets) नावाच्या लहान पोपटांच्या प्रजातीवर केलेल्या प्रयोगांवरून असे दिसून आले आहे की, हे पक्षीही इतर सदस्यांसाठी विशिष्ट आवाजांचे संकेत वापरतात. त्याचप्रमाणे, पाळीव पोपटांच्या मालकांवर केलेल्या एका सर्वेक्षणात सुमारे ८०० पैकी अर्ध्या पक्षांनी त्यांच्या आसपासच्या माणसांकडून शिकून, विशिष्ट व्यक्ती आणि प्राण्यांना ओळखण्यासाठी खास आवाजांचे संकेत वापरल्याचे समोर आले आहे.