

वॉशिंग्टन : जगाच्या पाठीवर ‘विघ्नसंतोषी’ माणसांची मुळीच कमतरता नाही. दुसऱ्याचे दुःख पाहून आसुरी आनंद होणारे अनेक लोक अवतीभोवती पाहायला सहजपणे मिळू शकतील; मात्र पशुपक्ष्यांमध्येही अशी विकृत भावना असते का? २०२३ मध्ये आफ्रिकन राखाडी (ग्रे) रंगाची ‘जॅक’ नावाचा पोपट त्याच्या मालकाच्या वडिलांच्या खोकण्याचा आणि धाप लागण्याचा हुबेहूब आवाज काढल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झाला होता. तिच्या मालकाचे वडील गंभीर ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (COPD) या फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. जॅक केवळ या आवाजांची नक्कल करते म्हणून प्रसिद्ध झाली नव्हती, तर तिला त्या व्यक्तीच्या त्रासाचा आनंद लुटताना पाहिले गेले, ज्या व्यक्तीचा ती तिरस्कार करत असे. या व्हिडीओमध्ये जॅकच्या मालकिणीने असा दावाही केला होता की, जॅकचा एक ‘आवडता खोकला’देखील होता.
या पोपटाचे हे वर्तन मानवामध्ये आढळणाऱ्या एका गुंतागुंतीच्या भावनेसारखे दिसत होते, ज्याला ‘शाडेनफ्रॉयडे’ (Schadenfreude) असे म्हणतात. जर्मन भाषेत या शब्दाचा शब्दशः अर्थ 'दुसऱ्याच्या दुःखात होणारा आनंद' असा होतो. ही एक अशी भावना आहे, जी सहसा एखादा प्रतिस्पर्धी सहकाऱ्याला कामावरून काढून टाकल्यावर किंवा उद्धट शेजाऱ्याचे पार्सल चोरीला गेल्यावर निर्माण होते. तसेच, जेव्हा एखादी मांजर माणसाला ठेच लागताना पाहून आनंदित दिसते किंवा एखादा घोडा माणसाचा पाय शेणात पडताना पाहून हसल्यासारखा वाटतो, तेव्हा त्यांचे मालकही या वर्तनाला ‘शाडेनफ्रॉयडे’ म्हणजेच दुसऱ्याच्या त्रासात आनंद मानतात.
प्राणी खरोखरच इतकी गुंतागुंतीची भावना अनुभवू शकतात का? की हा केवळ मानवी भावना प्राण्यांवर लादण्याचा प्रकार (Anthropomorphization) आहे? प्राण्यांचे वर्तन आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या मते, प्राणी बहुधा ‘शाडेनफ्रॉयडे’ ही भावना अनुभवत नाहीत. तरीही, या प्रश्नावर औपचारिक संशोधनात फारसे लक्ष दिलेले नाही. याला प्राण्यांच्या वर्तनाच्या संशोधन पद्धतींच्या मर्यादा कारणीभूत आहेतच, पण त्याचसोबत आपण भावनांची व्याख्या कशी करतो आणि व्यक्त कशी करतो, याच्याशीही हा प्रश्न जोडलेला आहे. 'जेव्हा तुम्ही अशा प्राण्याबद्दल बोलत असता जो आपल्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही, तेव्हा अशा गुंतागुंतीच्या भावनांचा अभ्यास करणे अत्यंत कठीण असते,' असे लॉस एंजिलीस येथील ऑक्सिडेंटल कॉलेजमधील ‘केनाइन इंटेलिजन्स लॅब’चे प्रमुख आणि मानसशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक झॅचरी सिल्व्हर यांनी सांगितले. 'शास्त्रज्ञ म्हणून आम्हाला जितकी अचूकता हवी असते, तितकी अचूकता या क्षेत्रात मिळवणे सध्या शक्य नाही.'