

लंडन : धोका जाणवला की कासव आपले डोके कवचात लपवतात, अशी एक जुनी आणि प्रचलित समजूत आहे. मात्र ही बाब सर्व कासवांबाबत खरी आहे का? तसेच आज जगभरातील कासवांना कवच आहे, त्यामागचे हेच कारण आहे का?
तज्ज्ञांच्या मते, काही कासवे डोके कवचात लपवू शकतात, तर काहींना ते शक्य नसते. शिवाय, जीवाश्म पुरावे सूचित करतात की कासवांचे कवच केवळ संरक्षणासाठी विकसित झालेले नाही, तर त्यामागे वेगळीच उत्क्रांती प्रक्रिया होती. जमिनीवर राहणारी कासवे (टॉर्टोईज) ही कासवांची एक प्रजाती असून ती आपले डोके कवचात लपवू शकते. ही उपजात सुमारे 5 कोटी वर्षांपूर्वी उदयास आली, अशी माहिती डेन्व्हर म्युझियम ऑफ नेचर अँड सायन्सचे पृष्ठवंशीय पुराजीवशास्त्राचे वरिष्ठ क्युरेटर टायलर लायसन यांनी दिली. ही कासवे साधारणपणे संथ गतीने हालचाल करतात, त्यामुळे भक्षकांपासून संरक्षणासाठी ती आपल्या कवचावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. बहुतेक जमिनीवरील कासवांचे कवच घुमटाकृती असते आणि आत पुरेशी जागा असल्यामुळे त्यांना डोके आत घेता येते.
जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी वावरणार्या काही कासवांच्या प्रजातीही असेच करू शकतात. “कासवांकडे डोके कवचात घेण्याच्या दोन पद्धती आहेत, असे केम्ब्रिज विद्यापीठातील पृष्ठवंशीय प्राण्यांच्या उत्क्रांती व पर्यावरणशास्त्राचे प्राध्यापक जेसन हेड यांनी सांगितले. ‘एक प्रकार म्हणजे बाजूला मान वाकवणारी कासवे. त्यांची मान लांब असते आणि ती डोके व मान एका हाताच्या बाजूला वळवतात. दुसरा प्रकार म्हणजे सापासारखी ‘एस’ आकाराची मान असलेली कासवे, जी मानेला वळण देऊन खांद्याच्या आत ओढू शकतात.
’ याचे एक उदाहरण म्हणजे ईस्टर्न बॉक्स टर्टल (Terrapene carolina carolina). या कासवाच्या खालच्या कवचाला, ज्याला प्लॅस्ट्रॉन म्हणतात, एक सांधा असतो. त्यामुळे हे कासव संपूर्ण कवचच बंद करू शकते. मात्र सागरी कासवे हा कासवांचा असा गट आहे, ज्यांना आपले डोके कवचात लपवता येत नाही. सागरी कासवांचे कवच अधिक गुळगुळीत व हलके असते आणि त्यात डोके आत घेण्यासाठी जागा नसते. ‘यामुळे शरीरावरचे वजन कमी राहते,’ असे हेड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सागरी कासवे जलद पोहू शकतात तसेच भक्षकांपासून लवकर पळ काढू शकतात.