Columbus birth mystery | डीएनए चाचणीतून उकलले कोलंबसच्या जन्माचे गूढ!

Columbus birth mystery |
Columbus birth mystery | डीएनए चाचणीतून उकलले कोलंबसच्या जन्माचे गूढ!
Published on
Updated on

माद्रिद (स्पेन) : प्रख्यात खलाशी आणि शोधकर्ता ख्रिस्तोफर कोलंबस याच्या मूळ उत्पत्तीबद्दल (ओरिजिन) एका नवीन डीएनए विश्लेषणातून धक्कादायक आणि इतिहास बदलणारा खुलासा झाला आहे. शतकानुशतके इतिहासकारांचे असे मत होते की, कोलंबसचा जन्म इटलीच्या जेनोआ येथे एका सामान्य कुटुंबात झाला होता. मात्र, स्पेनमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या ताज्या संशोधनाने या दाव्याला छेद दिला असून, कोलंबस हा प्रत्यक्षात स्पेनमधील एका उच्चभ्रू, राजेशाही घराण्याचा वंशज असण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.

स्पेनचा राजा?

माद्रिदच्या कॉम्प्लुटेंसे युनिव्हर्सिटी आणि सिटोजेन लॅबोरेटरीच्या संशोधकांनी नुकताच एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. यानुसार, कोलंबस हा इटलीचा नसून स्पेनच्या वायव्येकडील गॅलिसिया प्रांतातील अत्यंत शक्तिशाली आणि प्रतिष्ठित सोटोमायोर घराण्याचा वंशज होता. संशोधकांचा असा दावा आहे की 15 व्या शतकातील गॅलिसियाचे एक बलाढ्य सरंजामदार पेड्रो अल्वारेझ डी सोटोमायोर (ज्यांना पेड्रो मदुगा म्हणूनही ओळखले जाते) हे कोलंबसचे पूर्वज असावेत. हा शोध कोलंबसच्या गरीब इटालियन कुटुंबात जन्मलेला मुलगा या प्रतिमेला पूर्णपणे मोडीत काढतो.

शास्त्रज्ञांनी स्पेनमधील काउंटस् ऑफ जेल्व्हस कुटुंबाच्या दफनभूमीतून उत्खनन केलेल्या 12 मृतदेहांच्या डीएनए नमुन्यांचा अभ्यास केला. या ठिकाणी कोलंबसच्या नातीसह त्याच्या थेट वंशातील किमान 7 वंशजांचे अवशेष जतन केलेले आहेत. संशोधनादरम्यान दोन अशा व्यक्तींच्या डीएनएमध्ये साम्य आढळले ज्यांचा इतिहासानुसार कोणताही थेट संबंध नव्हता. यातील एक कोलंबसचा वंशज जॉर्ज अल्बर्टो होता, तर दुसरी गॅलिसियाची राजकन्या मारिया डी कॅस्ट्रो होती.

16 पिढ्यांचा अभ्यास

10,000 पेक्षा जास्त जेनेटिक मार्कर्स आणि कॉम्प्युटर मॉडेलिंगच्या साहाय्याने या कुटुंबाचा 16 पिढ्यांचा इतिहास तपासण्यात आला. व्हर्च्युअल नॉक-आऊट टेस्टमध्ये जेव्हा कॉम्प्युटर मॉडेलमधून पेड्रो मदुगा यांचे नाव डिजिटल पद्धतीने काढून टाकण्यात आले, तेव्हा या दोन वंशजांमधील अनुवंशिक संबंध पूर्णपणे नाहीसा झाला. यावरून पेद्रो मदुगा हेच या दोन्ही घराण्यांना जोडणारे मुख्य पूर्वज होते, हे सिद्ध झाले. डीएनए पुराव्यांव्यतिरिक्त इतिहासकारांनी इतरही अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. कोलंबसने लिहिलेल्या अनेक पत्रांमध्ये गॅलिशियन-पोर्तुगीज भाषेची छटा आढळते. कोलंबसच्या वैयक्तिक राजचिन्हाचे काही भाग हे सोटोमायोर कुटुंबाच्या चिन्हांशी तंतोतंत जुळणारे आहेत. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, हा निष्कर्ष कोलंबसच्या थेट वंशजांच्या डीएनएवर आधारित आहे, खुद्द कोलंबसच्या डीएनएवर नाही. त्यामुळे या सिद्धांताला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी अजून स्वतंत्र तपासणीची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news