DNA origami technology | ‘डीएनए ओरिगामी’ तंत्रज्ञानामुळे एड्सविरुद्धच्या लढ्याला बळ

DNA origami technology
DNA origami technology | ‘डीएनए ओरिगामी’ तंत्रज्ञानामुळे एड्सविरुद्धच्या लढ्याला बळ
Published on
Updated on

केंब्रिज (मॅसॅच्युसेटस्) : वैद्यकीय क्षेत्रात एका नवीन तंत्रज्ञानाने खळबळ उडवून दिली आहे. ‘डीएनए ओरिगामी’ पद्धतीचा वापर करून तयार केलेली लस, पारंपरिक लसींच्या तुलनेत एचआयव्ही (एड्स) सारख्या विषाणूंशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या रोगप्रतिकारक पेशींना अधिक प्रभावीपणे सक्रिय करते, असे उंदरांवरील एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे.

हे संशोधन 5 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध ‘सायन्स’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले असून, लस निर्मितीच्या पद्धतीत हा एक ‘मोठा टर्निंग पॉईंट’ मानला जात आहे. ज्याप्रमाणे कागदाला घड्या घालून विविध आकार दिले जातात (ओरिगामी), त्याचप्रमाणे ‘डीएनए’च्या धाग्यांना विशिष्ट पद्धतीने दुमडून त्रिमितीय (थ्रीडी) सांगाडा तयार केला जातो. या सांगाड्यावर विषाणूचे ‘अँटिजन्स’ (विषाणूचे असे भाग जे आपली रोगप्रतिकारशक्ती ओळखू शकते) बसवले जातात. सध्याच्या अनेक लसींमध्ये विषाणूच्या भागांना जोडण्यासाठी प्रथिनांचा वापर केला जातो. मात्र, आपली रोगप्रतिकारशक्ती या प्रथिनांना ‘परके’ समजून त्यांच्यावरच हल्ला करू लागते. यामुळे मुख्य विषाणूविरुद्धची प्रतिकारशक्ती कमी पडू शकते.

संशोधकांनी प्रथिनांच्या ऐवजी ‘डीएनए’ चा सांगाडा वापरला. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सांगाड्यावर हल्ला न करता थेट विषाणूच्या अँटिजन्सवर लक्ष केंद्रित करते. ‘एमआयटी’ मधील बायोलॉजिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आणि अभ्यासाचे सह-लेखक मार्क बाथे यांनी सांगितले की, या नवीन रचनेमुळे शरीरात ‘मेमरी बी-सेल्स’ तयार होण्याचे प्रमाण पारंपरिक लसींच्या तुलनेत तीन पटीने जास्त आढळले आहे. या पेशी भविष्यात होणार्‍या संसर्गाला रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. ‘हे संशोधन अत्यंत सुबक असून,

सांगाड्याशी संबंधित अनावश्यक प्रतिसाद काढून टाकल्यास रोगप्रतिकारशक्तीला योग्य दिशेने वळवता येते, हे यातून सिद्ध झाले आहे,’ असे वेल कॉर्नेल मेडिसिनमधील ‘एचआयव्ही’ संशोधक जॉन मूर यांनी स्पष्ट केले. हे तंत्रज्ञान केवळ ‘एचआयव्ही’ साठीच नाही, तर इतर कठीण आजारांवरील लसींच्या डिझाईनमध्येही क्रांती घडवून आणू शकते. शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे इम्युनोथेरपी आणि लसीकरण मोहिमा अधिक अचूक आणि शक्तिशाली होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news