Diwali Celebrations USA | व्हाईट हाऊसपासून टाईम्स स्क्वेअरपर्यंत दीपोत्सवाचा झगमगाट!

परदेशात भारतीय संस्कृतीचा डंका : दिवाळी साजरी
Diwali Celebrations USA |
Diwali Celebrations USA | व्हाईट हाऊसपासून टाईम्स स्क्वेअरपर्यंत दीपोत्सवाचा झगमगाट!
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन / लंडन : अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक असलेला दिवाळी सण यंदाही परदेशात अत्यंत उत्साहात आणि भव्य पद्धतीने साजरा करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या विशेष सोहळ्यापासून ते लंडनच्या डाऊनिंग स्ट्रीट आणि दुबईच्या रोषणाईपर्यंत, जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीचा अभूतपूर्व डंका पाहायला मिळाला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पारंपरिक दिवा लावून दिवाळी साजरी केली. या सोहळ्याला अमेरिकेतील अग्रगण्य भारतीय-अमेरिकन नागरिक, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये ‘आयबीएम’चे सीईओ अरविंद कृष्णा, अमेरिकेतील भारताचे राजदूत आणि इतर मान्यवरांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, भारतीय उद्योजक विशाल गोंडल यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना शौर्य आणि भक्तीचे प्रतीक असलेली ‘हनुमान चालिसा’ची प्रत भेट दिली.

व्हाईट हाऊससोबतच अमेरिकेतील ६ राज्यांचे गव्हर्नर आणि २२ हून अधिक महापौरांनी आपापल्या भागात अधिकृत दिवाळीचे आयोजन केले होते. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ‘टाईम्स स्क्वेअर’ परिसर तर संपूर्णपणे भारतीय रंगात न्हाऊन निघाला होता. तेथे ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक लोकनृत्ये आणि लखलखत्या रोषणाईने हजारो अनिवासी भारतीयांना मंत्रमुग्ध केले.

दुसरीकडे, युनायटेड किंगडम (यूके) मध्येही दिवाळीचा मोठा उत्साह दिसला. ब्रिटनच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’ येथे एका भव्य दीपावळी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. ब्रिटिश अधिकारी आणि पाहुण्यांनी फुलांचे हार घालून आणि दीप प्रज्वलित करून या उत्सवात सहभाग घेतला. तसेच, लिसेस्टरमधील प्रसिद्ध ‘गोल्डन माईल’ येथे युरोपमधील सर्वात मोठा सार्वजनिक दीपोत्‍सव पार पडला.

असाच उत्साह न्यूझीलंड आणि आखाती देशांमध्येही पाहायला मिळाला. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन येथे भारतीय समुदायाने भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये मेहंदी कला, भारतीय खाद्यपदार्थ आणि लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. तर दुबईमध्ये बॉलीवूडच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह भव्य ड्रोन शोचे आयोजन करून आकाशात दिव्यांची सुंदर आरास तयार करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा झालेला हा दीपोत्सव जागतिक नकाशावर भारताची वाढती सांस्कृतिक ताकद अधोरेखित करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.