

वॉशिंग्टन : कृष्णविवरे ही नेहमीच खगोल शास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा तसेच संशोधनाचा विषय बनून राहिलेली आहेत. सर्व काही गिळंकृत करणारी ही प्रचंड आकर्षण शक्तीची कृष्णविवरे प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी असतात. संशोधकांनी आता अशी काही कृष्णविवरे शोधली आहेत, जी अत्यंत वेगाने वर्तुळाकार फिरतात. त्यांचा हा वेग अपेक्षेपेक्षाही अधिक आहे. ब्रह्मांडाच्या 7 अब्ज वर्षांच्या इतिहासात अशा कृष्णविवरांनी जे वायू व धूळ गिळंकृत करून स्वतःला विस्तारित केले, त्यांच्याशीच या वेगाचा संबंध असल्याचे आढळले आहे.
स्लोअन डिजिटल स्काय सर्व्हेकडून याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. संशोधकांच्या मते प्रारंभीच्या काळातील ब्रह्मांड हे अनुमानापेक्षा अधिक नियमबद्ध असावे. अनेक मोठ्या कृष्णविवरांना गिळंकृत करून अनेक सुपरमॅसिव्ह ब्लॅकहोल्स म्हणजेच महाकाय व शक्तिशाली कृष्णविवरे अधिकाधिक मोठी झाली असावीत. हा प्रकार दोन आकाशगंगांची धडक होऊन एकमेकींमध्ये मिसळल्याने घडत होता. अशा कृष्णविवरांना आजूबाजूच्या वायू व धुळीचे ‘खाद्य’ मिळत गेल्याने ते आणखी विस्तारले. कनेक्टीकट युनिव्हर्सिटीतील लोगन फ्राईज यांनी याबाबतच्या संशोधनाची माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही अनेक आकाशगंगांच्या केंद्रभागी असलेल्या कृष्णविवरांचा अभ्यास केला. सध्याच्या आकाशगंगांपासून ते सात अब्ज वर्षांपूर्वीच्या आकाशगंगांचा यामध्ये समावेश आहे. त्यामधून आम्हाला असे दिसून आले की, दोन आकाशगंगांच्या मिलाफानंतर बनलेल्या कृष्णविवरांबाबतच्या अनुमानापेक्षाही ते जलद गतीने फिरतात. त्यांनी खेचून घेतलेल्या मोठ्या प्रमाणातील सामग्रीचा हा परिणाम आहे. अशी महाकाय कृष्णविवरे ही आपल्या सूर्याच्या तुलनेत लाखो किंवा अब्जावधी पटीने अधिक वस्तुमानाची असतात.