

लंडन : युनिव्हर्सिटी ऑफ गॅलवे येथील संशोधकांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या एका टीमने यापूर्वी अज्ञात असलेल्या एका ग्रहाचा आश्चर्यकारक शोध लावला आहे. हा नवजात वायुमय व महाकाय ग्रह सूर्यासारख्या तार्याभोवतीच्या अनेक वलयां-असलेल्या तबकडीमध्ये आढळून आला आहे. त्याची सक्रिय निर्मिती ग्रहांच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्याची एक दुर्मीळ संधी देत आहे. हा ग्रह त्याच्या विकासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असून, त्याचे वय सुमारे 50 लाख वर्षे आहे. आकाराने तो गुरू ग्रहाएवढा असण्याची शक्यता आहे.
लिडन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखालील या संशोधनाचे निष्कर्ष ‘अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. हा महत्त्वपूर्ण शोध युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीच्या व्हेरी लार्ज टेलिस्कोप (VLT) या जगातील सर्वात प्रगत खगोलशास्त्रीय सुविधांपैकी एक असलेल्या दुर्बिणीचा वापर करून लावण्यात आला, जी चिलीमधील अटाकामा वाळवंटात स्थित आहे. नव्याने ओळखल्या गेलेल्या या ग्रहाला WISPIT 2 b असे नाव देण्यात आले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ गॅलवे येथील स्कूल ऑफ नॅचरल सायन्सेसचे व्याख्याता आणि अभ्यासाचे दुसरे लेखक डॉ. ख्रिश्चन गिन्स्की म्हणाले: ‘आम्ही अनेक तरुण तार्यांच्या खूप लहान ‘स्नॅपशॉट’ निरीक्षणांचा वापर केला - प्रत्येक वस्तूसाठी फक्त काही मिनिटे - जेणेकरून आम्हाला त्यांच्या शेजारी ग्रहामुळे दिसणारा प्रकाशाचा लहान ठिपका दिसतो का, हे तपासता येईल. मात्र, या तार्याच्या बाबतीत आम्हाला त्याऐवजी एक अपेक्षित नसलेली आणि अपवादात्मक सुंदर, अनेक वलये असलेली धूळ तबकडी दिसली.
जेव्हा आम्ही ही बहु-वलयांकित तबकडी पहिल्यांदा पाहिली, तेव्हा आम्हाला कळले की त्यामध्ये एखादा ग्रह शोधण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. त्यामुळे आम्ही त्वरित पुढील निरीक्षणांसाठी विनंती केली. सूर्यासारख्या तार्याच्या इतक्या लवकर उत्क्रांतीच्या टप्प्यात पुष्टी झालेला ग्रह सापडण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. यापूर्वीचा पहिला ग्रह 2018 मध्ये सापडला होता, ज्यात डॉ. गिन्स्की यांचाही समावेश होता.