Four Winged Dinosaur | चार पंख असलेल्या डायनासोरच्या नव्या प्रजातीचा शोध

प्राचीन पक्ष्यांची शिकार करण्यात होता पटाईत
Four Winged Dinosaur |
Four Winged Dinosaur | चार पंख असलेल्या डायनासोरच्या नव्या प्रजातीचा शोध
Published on
Updated on

बीजिंग : पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी एका अत्यंत दुर्मीळ आणि वेगळ्या प्रकारच्या डायनासोरचा शोध लावला आहे. चार पंखांसारखे अवयव आणि अंगावर पिसे असलेला हा शिकारी डायनासोर कोट्यवधी वर्षांपूर्वी सध्याच्या वायव्य चीनमधील तलावांच्या कडेला असलेल्या जंगलात वावरत असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उडणाऱ्या खारीप्रमाणे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेण्याची आणि क्रेटेशियस युगातील सुरुवातीच्या पक्ष्यांना हवेतच पकडून त्यांची शिकार करण्याची या डायनासोरची क्षमता होती.

या नव्या डायनासोरचे नाव ‘ज्यान चांगमाएन्सिस’ (Jian changmaensis) असे ठेवण्यात आले आहे. हा डायनासोर प्रसिद्ध ‘वेलोसिराप्टर’ (Velociraptor) चा जवळचा नातेवाईक होता आणि तो ‘मायक्रोरॅप्टर्स’ (Microraptors) नावाच्या छोट्या, पक्ष्यांसारख्या दिसणाऱ्या डायनासोरच्या विचित्र गटातील होता. ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटात दाखवलेल्या मोठ्या आणि खवले असलेल्या रॅप्टर्सपेक्षा हे प्राणी अगदी वेगळे होते. ते वजनाने हलके होते, त्यांच्या अंगावर पिसे होती आणि ते हवेत तरंगत (Glide) प्रवास करत असत. जीवाश्मांच्या पुराव्यानुसार, J. changmaensis च्या हात आणि पाय दोन्हीवर लांब पिसे होती, ज्यामुळे तो चार पंख असलेल्या एखाद्या लहान ड्रॅगनसारखा दिसत असावा. ‘अ‍ॅनल्स ऑफ कार्नेगी म्युझियम’ या वैज्ञानिक मासिकात गुरुवारी (४ जून) प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, या डायनासोरचा डावा खांदा आणि पुढच्या पायाचा काही भागच जीवाश्माच्या रूपात सापडला आहे. परंतु, एक नवीन प्रजाती शोधण्यासाठी आणि चीनच्या ‘चांगमा बेसिन’मधील अनेक वर्षांचे गूढ उकलण्यासाठी ही हाडे पुरेशी ठरली आहेत.

चांगमा बेसिन हे ठिकाण प्राचीन पक्ष्यांचे जीवाश्म आणि त्यांच्या तुटलेल्या हाडांसाठी ओळखले जाते. ही हाडे आजच्या काळातील घुबडांनी उलटी करून बाहेर टाकलेल्या हाडांच्या गोळ्यांसारखी दिसतात. पिट्सबर्गमधील ‘कार्नेगी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी’चे वरिष्ठ संशोधक मॅथ्यू लॅमन्ना यांनी सांगितले की, ‘आमच्या संघाने चांगमा येथे पक्ष्यांचे १०० हून अधिक जीवाश्म शोधले आहेत. परंतु, पक्षी नसलेल्या (Non-avian) डायनासोरचा हा एकमेव नमुना आहे. मायक्रोरॅप्टर्स हे पहिल्या पक्ष्यांचे सर्वात जवळचे पूर्वज कसे असावेत, यावर प्रकाश टाकतात. त्यांचा अभ्यास केल्याने पक्ष्यांची सुरुवात कशी झाली आणि ते उडायला कसे शिकले, याबद्दलचे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागू शकतात.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news