

पॅरिस : फ्रान्समध्ये पुरातत्त्व संशोधकांनी 1800 वर्षांपूर्वीच्या सोन्याच्या अंगठीचा शोध लावला आहे. या अंगठीवर रोमन देवता व्हिनसची आकृती कोरलेली आहे. ही देवता युद्धातील विजयाचे प्रतीक आहे. या विजयदेवतेच्या अंगठीसह तिथे कॅरोलिंजियन साम्राज्याच्या काळातील काही नाणीही सापडली आहेत.
फ्रान्सच्या ब्रिटनीमधील पेस या शहराजवळील एका विशिष्ट ठिकाणी उत्खननात ही अंगठी सापडली. फ्रेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव आर्कियोलॉजिकल रिसर्चने याबाबतची माहिती दिली आहे. या अंगठीत जे ‘निकोलो’ नावाचे रत्न बसवले आहे त्यावर ही व्हिनस देवता कोरलेली आहे. हे रत्न काळसर रंगाचे असते व त्यावर निळसर रंगाचे आवरण असते. ही अंगठी दुसर्या किंवा तिसर्या शतकातील असावी असे संशोधकांना वाटते. त्यावेळी फ्रान्सच्या या भागातही रोमन साम्राज्याची सत्ता होती. ही अंगठी कुणाच्या मालकीची होती हे समजलेले नाही. मात्र रोमन काळातील एका रस्त्याजवळ ती सापडलेली आहे. त्यावेळी अनेक रथ किंवा चाक असलेली वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत होती. याच ठिकाणी काही नाणी व मध्ययुगातील एक शिरस्राणही सापडले आहे.