

लंडन : पुरातत्त्व संशोधकांनी युरोपमधील लक्झेम्बर्गमध्ये रोमन काळातील सोन्याच्या नाण्यांचा खजिना शोधून काढला आहे. ही नाणी सुमारे 1700 वर्षांपूर्वीची आहेत. एखाद्या मनोर्यासारख्या दिसणार्या रोमन किल्ल्याच्या पायाजवळ ही नाणी सापडली. हा किल्ला उत्तर लक्झेम्बर्गच्या होल्जथम गावात आहे. उत्खननात संशोधकांच्या पथकाला 141 सोन्याची नाणी सापडली. ही नाणी इसवी सन 364 ते 408 या काळातील असावीत, असा अंदाज आहे. हा एक महत्त्वाचा शोध असून त्यामुळे तत्कालीन समाजाविषयी अधिक माहिती मिळू शकेल.
उत्खननात सापडलेल्या नाण्यांवर आठ सम्राटांची चित्रे कोरलेली आहेत. त्यापैकी तीन नाण्यांवरील यूजीनियसचे चित्र तज्ज्ञांना चकित करीत आहे. यूजीनियस पश्चिम रोमन साम्राज्यावर केवळ दोन वर्षे म्हणजे इसवी सन 392 ते 394 या काळात सत्तेवर होता. तो खरे तर एक शिक्षक आणि दरबारी अधिकारी होता. त्याला एका शक्तिशाली सैन्य अधिकार्याने सम्राट घोषित केले होते. ही घटना सम्राट व्हॅलेंटियन द्वितीय याच्या रहस्यमय स्थितीत झालेल्या फाशीनंतर घडली. पूर्व रोमन साम्राज्यातील सम्राट थियोडोसियस प्रथम याने यूजीनियसला सम्राट मानण्यास नकार दिला होता. त्याला यूजीनियसची धार्मिक सहिष्णुताही पसंत नव्हती. यामुळे अखेर युद्ध झाले. सप्टेंबर 394 मध्ये फ्रिगिडसच्या युद्धात यूजीनियसचा पराभव झाला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचा शासनकाळ अतिशय छोटा असल्याने या नाण्यांवर त्याची प्रतिमाही कोरलेली असणे आश्चर्यकारक आहे. या नाण्यांची सध्याची किंमत सुमारे 3 लाख 22 हजार अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. उत्खननात सापडलेल्या या नाण्यांना ‘सॉलिडी’ असे म्हणतात. हा शब्द लॅटिनच्या ‘सॉलिडस’ या शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ ‘ठोस’. हे नाव सोन्याची शुद्धता दर्शवणारे आहे. प्रत्येक नाण्याचे वजन 0.16 औंस म्हणजे 4.5 ग्रॅम आहे. ही नाणी चौथ्या शतकाच्या प्रारंभी उत्तर रोमन साम्राज्यात चलनामध्ये आली होती. सॉलिडस अनेक शतके वापरात होते आणि संपूर्ण भूमध्य क्षेत्रात हे चलन पसरले होते.