Mega-Earth Giant Exoplanet | पृथ्वीपेक्षा २३ पट मोठ्या महाकाय ‘मेगा-अर्थ’ ग्रहाचा शोध

खगोलशास्त्रज्ञांसमोरील नवीन कोडे
Mega-Earth Giant Exoplanet |
Mega-Earth Giant Exoplanet | पृथ्वीपेक्षा २३ पट मोठ्या महाकाय ‘मेगा-अर्थ’ ग्रहाचा शोध
Published on
Updated on

वॉशिंग्टन : विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाच्या खगोलशास्त्रज्ञांनी अवकाशात एका अत्यंत दुर्मीळ, महाकाय आणि अतिघनदाट अशा ‘मेगा-अर्थ’ ग्रहाचा शोध लावला आहे. ‘जीजे ५२३ बी’ असे नाव देण्यात आलेला हा ग्रह त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे आणि अवाढव्य वस्तुमानामुळे संपूर्ण खगोलशास्त्र जगतात चर्चेचा विषय ठरला आहे.

या ग्रहाच्‍या संशोधनात काही महत्त्वाचे आणि रंजक पैलू समोर आले आहेत. हा ग्रह पृथ्वीच्या तुलनेत तब्बल २३.५ पट अधिक वस्तुमान (मास) असलेला आहे. मात्र, आश्चर्य म्हणजे त्याचे आकारमान पृथ्वीच्या केवळ २.५ पट इतकेच आहे. नेपच्यूनच्या सुमारे ६० टक्के आकार असलेला हा ग्रह अत्यंत घनदाट खडकांचा गोळा आहे.

वायूच्या थरांचा अभाव

खगोलशास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, पृथ्वीपेक्षा १० ते २० पट मोठे वस्तुमान असलेल्या ग्रहांचे गुरुत्वाकर्षण हायड्रोजन आणि हेलियम वायूंचा जाड थर स्वतःभोवती ओढून घेते. परंतु, २३ पटीहून अधिक वस्तुमान असूनही ‘जीजे ५२३ बी’ वर कोणताही जाड वायूचा थर नाही, त्‍यामुळे शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

नासाच्या ‘टेस’ दुर्बिणीद्वारे शोध

नासाच्या ‘टीईएसएस’ अंतराळ दूरबिनीने ताऱ्याच्या प्रकाशातील अंधुकपणावरून या ग्रहाचा शोध घेतला. संशोधक मॅक्स क्रॉफ्ट आणि त्यांच्या टीमने ‘डब्‍ल्‍यूआयवायएन’ दुर्बिणीवरील ‘एनईआयडी’ स्पेक्ट्रोस्कोपद्वारे याच्या वस्तुमानाची अचूक मोजणी केली. संशोधकांनी या ग्रहाच्‍या निर्मितीमागची संभाव्य कारणेही सांगितली आहेत. निर्मितीच्या काळात प्रचंड उष्णतेमुळे या ग्रहावरील सर्व वायू अंतराळात निघून गेले असावेत. तसेच, एका केशरी बटू (ऑरेंज ड्वॉर्फ़) ताऱ्याभोवती फिरणाऱ्या या ग्रहाची कक्षा ७१ अंशांनी झुकलेली असल्याने भूतकाळात येथे मोठी खगोलशास्त्रीय धडक झाली असावी. आपली सूर्यमाला ४.५४ अब्ज वर्षे जुनी असताना, ‘जीजे ५२३ बी’ ग्रहाची ही प्रणाली अवघ्या १७० दशलक्ष वर्षे जुनी (बेबी सिस्‍टीम) आहे. ६,००० हून अधिक शोधलेल्या बहिर्ग्राहांपैकी ‘जीजे ५२३ बी’ हा ग्रहांच्या निर्मितीचे नवीन नियम समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news