Astronomical Discovery | ब्रह्मांड निर्मितीच्या काळातील खगोलीय घटकाचा शोध

Astronomical Discovery |
Astronomical Discovery | ब्रह्मांड निर्मितीच्या काळातील खगोलीय घटकाचा शोध
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप वापरून खगोलशास्त्रज्ञांनी महास्फोटानंतर (बिग बँग) अवघ्या ४५ कोटी वर्षांनंतर अस्तित्वात असलेल्या एका अत्यंत लहान आणि लाल रंगाच्या खगोलीय वस्तूचा शोध लावला आहे. CW-LRD-z10 असे नाव देण्यात आलेली ही वस्तू कदाचित "लिटल रेड डॉट" या गूढ खगोलीय प्रकारातील असू शकते. अनेक संशोधकांच्या मते, 'लिटल रेड डॉट' म्हणजे वायूच्या दाट आवरणात वाढणारी कृष्णविवरे आहेत. या शोधाला दुजोरा मिळाल्यास, हे आतापर्यंतचे सर्वात प्राचीन उदाहरण ठरेल आणि अशा गूढ वस्तूंची निर्मिती कशी होते, यावर नवा प्रकाश पडू शकेल.

या अभ्यासात सहभागी नसलेले केंब्रिज विद्यापीठातील प्रायोगिक खगोलभौतिकशास्त्राचे प्राध्यापक रॉबर्टो मायोलिनो यांनी सांगितले की, "अशी एखादी वस्तू ज्ञात असलेल्या सर्वात दूरच्या आणि द्रव्य शोषून घेणाऱ्या कृष्णविवरांपैकी एक ठरेल." महाकाय कृष्णविवरांच्या निर्मितीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यांचा मागोवा 'लिटल रेड डॉट' घेतात, याला या वस्तूमुळे आणखी पुष्टी मिळू शकेल, असेही त्यांनी नमूद केले. हा अभ्यास २४ नोव्हेंबर रोजी 'ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स' मध्ये प्रसिद्ध झाला आहे. 'लिटल रेड डॉट' (LRDs) म्हणजे सुरुवातीच्या विश्वातील अत्यंत लहान आणि अतिशय लाल दिसणाऱ्या वस्तूंचा एक समूह आहे. एखादी वस्तू जितकी जास्त दूर असते, तितका तिचा प्रकाश अधिक लांब आणि लाल तरंगलांबीकडे ताणला जातो. या घटनेला रेडशिफ्ट म्हणतात.

'जेम्स वेब' मुळेच LRDs चा शोध अलीकडेच लागला आहे. या दुर्बिणीच्या 'निअर-इन्फ्रारेड' कॅमेऱ्याद्वारे केवळ सुमारे ९ रेडशिफ्टपर्यंतच्या (म्हणजेच सुमारे १३.१ अब्ज वर्षांपूर्वीच्या) वस्तू टिपता येत होत्या. त्यामुळे, २०२५ मध्ये या अभ्यासामागील पथकाने अधिक दूरच्या स्रोतांचा शोध घेण्यासाठी 'जेम्स वेब' च्या मिड-इन्फ्रारेड इन्स्ट्रुमेंटचा वापर केला. टोकियो विद्यापीठातील डॉक्टरेटचे विद्यार्थी आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक ताकुमी तनाका यांनी सांगितले की, या शोधात सापडलेली CW-LRD-z10 ही एकमेव संभाव्य वस्तू होती. संशोधकांनी या लहान, लाल वस्तूचा रेडशिफ्ट मोजला असता तो १०.३६ इतका आढळला. यावरून असे दिसून येते की, विश्व केवळ ४५ कोटी वर्षांचे असताना या वस्तूतून प्रकाश उत्सर्जित झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.