

सँटियागो (चिली) : दक्षिण अमेरिकेतील चिली येथील ‘मॉन्टे वर्दे’ हे मानवी वस्तीचे सर्वात जुने पुरावे मानले जाणारे ठिकाण सध्या जागतिक पुरातत्त्व विभागात वादाच्या भोवर्यात सापडले आहे. हे स्थळ 14,500 वर्षांपूर्वीचे असल्याचा आजवरचा दावा संशोधकांच्या एका गटाने खोडून काढला असून ते त्यापेक्षा कितीतरी तरुण असल्याचा नवा तर्क मांडला आहे. मात्र, इतर तज्ज्ञांनी या नवीन अभ्यासाला अत्यंत निकृष्ट दर्जाचे भौगोलिक काम म्हणत फेटाळून लावले आहे.
दक्षिण चिलीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले ‘मॉन्टे वर्दे’ हे ठिकाण 1976 मध्ये शोधले गेले होते. येथे दगडाची हत्यारे, जतन केलेले लाकूड, नामशेष झालेल्या प्राण्यांची हाडे आणि कातडी, मानवी पाऊलखुणा, खाद्य वनस्पतींचे अवशेष आणि नैसर्गिक दोर सापडले होते. ‘रेडिओकार्बन डेटिंग’नुसार, यातील मुख्य स्तर (MV-II) सुमारे 14,500 वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जात होते. ‘सायन्स’ ( Science) या नियतकालिकात 19 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात युनिव्हर्सिटी ऑफ वायोमिंगचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ टॉड सुरोवेल आणि त्यांच्या टीमने म्हटले आहे की, हे ठिकाण केवळ 4,200 ते 8,200 वर्षांपूर्वीचे आहे. ज्याला आपण 14,500 वर्षे जुने मानून अमेरिकेतील मानवी स्थलांतराचा इतिहास बदलला, ते ठिकाण प्रत्यक्षात जास्तीत जास्त 8,000 वर्षे जुने आहे.
थोडक्यात सांगायचे तर हे हिमयुगातील ठिकाण नाहीच, असे सुरोवेल यांनी सांगितले. मॉन्टे वर्देच्या जुन्या तारखेमुळे (14,500 वर्षे) इतिहासकारांना आपली मते बदलावी लागली होती. पूर्वी असे मानले जायचे की ‘क्लोविस’ लोक 13,000 वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत आले. मॉन्टे वर्देमुळे असे सुचवण्यात आले की, क्लोविस लोकांच्या आधीच काही मानवी गट समुद्रकिनार्याच्या मार्गाने दक्षिण अमेरिकेत पोहोचले होते. जरी अमेरिकेत क्लोविसपूर्व इतर अनेक ठिकाणे (उदा. ओरेगॉनमधील पेस्ले केव्हस्, न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँडस्) सापडली असली तरी दक्षिण अमेरिकेतील ‘लेट प्लिस्टोसीन’ काळातील हे एकमेव खात्रीशीर ठिकाण मानले जात होते. आता नव्या संशोधनामुळे यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सुरोवेल यांचा हा नवा अभ्यास वादात सापडला आहे. अनेक जुन्या तज्ज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते, या नवीन संशोधनात भूगर्भीय रचनेचा अभ्यास करताना गंभीर चुका झाल्या आहेत. मॉन्टे वर्दे हे ठिकाण खरोखरच 14,500 वर्षे जुने आहे की केवळ 8,000 वर्षे जुने, यावरून आता पुरातत्त्व विश्वात दोन गट पडले आहेत.