

लंडन : महाकाय आणि अवाढव्य डायनासोर म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर मोठमोठी झाडेझुडपे खाणारे शाकाहारी किंवा इतर प्राण्यांची शिकार करणारे मांसाहारी जीव उभे राहतात. मात्र, सुमारे १० कोटी वर्षांपूर्वी समुद्रकिनाऱ्यालगत राहणारे डायनासोर आपल्या आहारात चक्क ‘समुद्री शेवाळ’ आणि इतर सागरी अन्नाचाही समावेश करत होते, असा आश्चर्यकारक उलगडा एका नवीन संशोधनातून झाला आहे. डायनासोरच्या जीवाश्म दातांमध्ये सापडलेल्या सूक्ष्म रासायनिक खुणांच्या आधारे शास्त्रज्ञांनी हा अनोखा निष्कर्ष काढला आहे.
‘फ्रंटियर्स इन इकोलॉजी अँड इव्होल्यूशन’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ आर्कान्सासचे भूवैज्ञानिक डॉ. क्लेटन फोर्स्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राचीन समुद्रकिनाऱ्यावर आणि अंतर्गत भूभागात आढळलेल्या डायनासोर, मगरी, कासवे आणि माशांच्या दातांच्या जीवाश्मांचा सखोल अभ्यास केला. वनस्पतींमध्ये ‘हलका’ (सी-१२) आणि ‘जड’ (सी-१३) असे कार्बनचे दोन प्रकार असतात. प्राणी जे अन्न खातात, त्यातील कार्बनचे अंश त्यांच्या दातांच्या इनॅमलमध्ये साठवले जातात. जमिनीवरील वनस्पतींच्या तुलनेत समुद्री वनस्पतींमध्ये जड कार्बनचे प्रमाण जास्त असते.
संशोधकांना असे आढळून आले की, प्राचीन समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या डायनासोरच्या दातांमध्ये या जड कार्बनचे प्रमाण जमिनीवरील अंतर्गत भागात राहणाऱ्या डायनासोरपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त होते. वादळामुळे किनाऱ्यावर वाहून आलेले समुद्री शेवाळ हे याचे मुख्य कारण असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. आजही समुद्रकिनाऱ्यावर राहणारे अनेक शाकाहारी प्राणी अन्नाची कमतरता भासल्यास समुद्री शेवाळ खातात; नेमकी हीच सवय क्रिटेशियस युगातील शाकाहारी डायनासोरमध्येही होती. या शाकाहारी डायनासोरची शिकार करणाऱ्या मांसाहारी प्राण्यांच्या शरीरातही अन्नसाखळीद्वारे हे सागरी पोषक घटक पोहोचले.
विशेष म्हणजे, सर्वच डायनासोरना समुद्री अन्नाची आवड नव्हती. ‘टेनॉन्टोसॉरस टिलेट्टी’ नावाच्या एका मोठ्या शाकाहारी डायनासोरच्या दातांमध्ये केवळ जमिनीवरील वनस्पती खाण्याच्याच खुणा आढळल्या आहेत. या संशोधनामुळे लाखो वर्षांपूर्वीपासून जमीन आणि समुद्रातील परिसंस्था एकमेकांशी किती घट्ट जोडलेल्या होत्या, यावर नवा प्रकाश पडला आहे.