

शेंजेन : चीनच्या शेंजेन स्थित रोबोटिक्स कंपनी ‘डोबोट’ ने जगाला अचंबित करणारा 13 कोटी वर्षांपूर्वीच्या एका पंखदार डायनासोरचा जिवंत भासणारा रोबोटिक नमुना सादर केला आहे. हा रोबो केवळ चालतो आणि श्वास घेतो असे नाही, तर तो आपल्या सभोवतालच्या वातावरणाला अनुभवूही शकतो.
कंपनीचे म्हणणे आहे की, हा रोबो खास करून पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रासाठी डिझाईन करण्यात आला आहे. याचा अर्थ लवकरच हा रोबो म्युझियम्स (संग्रहालये), थीम पार्क्स किंवा वर्गखोल्यांमध्ये मुलांना डायनासोरच्या युगाची झलक दाखवू शकेल. डोबोट कंपनीने सांगितले की, याच तंत्रज्ञानाचा उपयोग भविष्यात इतर प्राचीन, पौराणिक किंवा सांस्कृतिक व्यक्तिरेखांचे रोबो बनवण्यासाठीही केला जाईल. म्हणजेच, फक्त बाहेरील आवरण (स्किन) बदलून नवीन रोबो तयार करणे शक्य होणार आहे. यामुळे हे स्पष्ट होते की, चीनचा रोबोटिक्स उद्योग आता केवळ फॅक्टरी आणि औद्योगिक वापरापलीकडे जाऊन शिक्षण, पर्यटन आणि मनोरंजन यांसारख्या क्षेत्रांकडे वाटचाल करत आहे.
चीनच्या रोबोटिक्स उद्योगाची वाढ: चीन अजूनही जगातील सर्वात मोठा रोबो निर्माता देश आहे. 2024 मध्ये चीनने 5.56 लाख औद्योगिक रोबो आणि 1.05 कोटी सेवा युनिटस् (Service Units) तयार केले, जी अनुक्रमे 14% आणि 16% वाढ दर्शवते. डोबोट कंपनीने सांगितले की, 2024 च्या पहिल्या सहामाहीत त्यांच्या उत्पन्नात 27% वाढ झाली आहे. या वाढीचे श्रेय त्यांच्या लोकप्रिय सिक्स-एक्सिस कोबॉटस्ला जाते. हे रोबोटिक आर्म्स मानवी हाताप्रमाणे लवचिक असून, इलेक्ट्रॉनिक्सपासून लॉजिस्टिक्सपर्यंत अनेक उद्योगांमध्ये वापरले जात आहेत.