

पुदुकोट्टई (तामिळनाडू) : सिल्लत्तूरमधील एका सरकारी शाळेच्या वर्गात खडूचा आवाज येत नाही; पण तरीही तिथे ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू आहे. हे काम करत आहेत 34 वर्षीय तमिळ शिक्षक पोन शक्तिवेल. स्वतः जन्मजात दृष्टिहीन असूनही, त्यांनी आपल्या शारीरिक उणिवांना कधीही यशाच्या आड येऊ दिले नाही. उलट, आपल्यासारख्या इतर हजारो दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी डिजिटल क्रांतीची मशाल हाती घेतली आहे.
स्वतंत्र वाचनाचे स्वप्न साकार
बहुतेक दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना वाचनासाठी दुसऱ्याच्या आवाजावर किंवा वेळेवर अवलंबून राहावे लागते. हीच अडचण ओळखून शक्तिवेल यांनी 2019 पासून छापील पुस्तकांचे रूपांतर डिजिटल स्वरूपात करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी 2,000 हून अधिक पुस्तके डिजिटाईज केली आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे आत्मचरित्र ‘नेंजुक्कू नीती’ आणि साहित्य अकादमीची अनेक महत्त्वाची पुस्तके समाविष्ट आहेत.
तंत्रज्ञानाची घेतली साथ
शक्तिवेल यांनी केवळ जिद्दीच्या जोरावर केंद्र सरकारकडून मिळालेल्या 65,000 रुपयांच्या संशोधन अनुदानातून एक हाय-टेक ड्युप्लेक्स स्कॅनर खरेदी केला. ओसीआर सॉफ्टवेअरच्या मदतीने ते पुस्तकांचे मजकूर डिजिटल फाइल्समध्ये रूपांतरित करतात. या फाइल्स स्क्रीन-रीडर किंवा टेक्स्ट-टू-स्पीच ॲप्सद्वारे दृष्टिबाधित विद्यार्थी सहज ऐकू किंवा वाचू शकतात.
त्यांनी विरल मोझियिन नूल थिरट्टूनावाचा एक अनोखा उपक्रम व्हॉटस्ॲपवर सुरू केला आहे. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक आपल्या आवडत्या पुस्तकांची यादी देतात. पुस्तक खरेदीसाठी लागणारा निधी सदस्य गोळा करतात, तर त्या पुस्तकांचे मोफत डिजिटायझेशन करण्याचे काम शक्तिवेल करतात. 2025 पर्यंत या गटाने यशस्वीरीत्या 16 टप्पे पूर्ण केले असून, शेकडो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे.