

न्यूयॉर्क : कासव (Tortoise) आणि जल-कासव (Turtle) दोन्ही कवच असलेले प्राणी आहेत, पण ते सारखे नाहीत. तर त्यांना कसे ओळखायचे? ‘सर्व कासव हे जल-कासव असतात, पण सर्व जल-कासव कासव नसतात,’ असे कोलंबस प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालयातील सरपटणार्या प्राण्यांची काळजी घेणार्या सिडनी फेन यांनी सांगितले. सामान्यतः, ज्या प्राण्यांना लोक जल-कासव म्हणतात, ते पाण्यात जास्त वेळ घालवतात, तर कासव जमिनीवर राहतात, असे कॅलिफोर्नियातील ‘जीनियस वेटस्’ने म्हटले आहे.
कासव आणि जल-कासवांमधील अनेक फरक त्यांच्या अधिवासामुळे निर्माण होतात.
कवच ( Shell) :
जल-कासव (Turtles) : पाण्यात राहणार्या जल-कासवांचे कवच सामान्यतः सपाट असते, ज्यामुळे त्यांना तलाव, नद्या किंवा समुद्रात पोहण्यास मदत होते.
कासव (Tortoises) : कासव पोहत नाहीत किंवा कमी पोहतात, त्यामुळे त्यांचे कवच घुमटाच्या (dome) आकाराचे असते. या आकारामुळे त्यांना काही फायदे मिळतात. फेन यांच्या मते, ‘कासव चालताना चुकून पाठीवर पडले, तर कवचाच्या घुमटाकारामुळे त्यांना परत उभे राहण्यास मदत होते. तसेच, या आकारामुळे आत अधिक जागा मिळते, ज्यामुळे काही कासव आपले सर्व अवयव कवचात पूर्णपणे आत घेऊ शकतात.‘या नियमांना काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ, आफ्रिकेतील ‘पॅनकेक टॉरटॉईज’चे कवच सपाट आणि कमी मजबूत असते, ज्यामुळे ते खडकांच्या फटींमध्ये पटकन शिरू शकतात.
पाय (Feet):
जल-कासव (Turtles) : पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहणार्या जल-कासवांचे पाय जाळीदार (webbed) असतात, ज्यामुळे त्यांना पोहण्यात आणि जमिनीवर फिरण्यात मदत होते. पूर्णपणे पाण्यात राहणार्या सागरी जल-कासवांना फ्लिपर्स (flippers) असतात.
कासव (Tortoises): याउलट, कासवांचे पाय सामान्यतः गोल आणि आखूड असतात. सॅन डिएगो प्राणीसंग्रहालयाच्या मते, ‘कमी लांबीचे, मजबूत आणि स्थिर पाय त्यांना जमिनीवर जड कवच घेऊन सहजपणे चालण्यास मदत करतात. ‘फेन यांनी सांगितले की, वाळवंटात राहणार्या कासवांना ‘उंटांच्या पायांप्रमाणे रुंद पाय असतात, ज्यामुळे त्यांना वाळूवर चालणे सोपे जाते.’
आहार : सामान्यतः कासव शाकाहारी, तर जल-कासव (turtles) सर्वभक्षी असतात, असे फेन यांनी सांगितले. जल-कासव पोहू शकत असल्यामुळे, ते पाण्यातील शिकार पकडण्यासाठी पुरेसे जलद असतात आणि त्यामुळे त्यांचा आहार अधिक व्यापक असतो. याउलट, कासव जमिनीवर खूप हळू चालतात, त्यामुळे ते सहसा वनस्पती खातात.
1) आहारातील अपवाद : फेन यांच्या म्हणण्यानुसार, कासव (tortoises) संधी मिळाल्यास मांस खाऊ शकतात. ‘ते वाघासारखे सक्रिय शिकार करत नाहीत. परंतु, जर त्यांना कीटक किंवा मेलेल्या प्राण्यांचे मांस मिळाले, तर ते खाऊ शकतात.’
याशिवाय, काही जल-कासव, जसे की ग्रीन सी टर्टल (green sea turtle), शाकाहारी असतात, असे ‘नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन’ने म्हटले आहे.
2) भौगोलिक वितरण : आंतरराष्ट्रीय प्राणी कल्याण निधीनुसार, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका वगळता कासव प्रत्येक खंडात आढळतात. ते सहसा वाळवंट आणि जंगलांसारख्या उष्ण वातावरणात राहतात. जल-कासव अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडात राहतात. सागरी जल-कासव जगभरातील समुद्रांमध्ये आपले जीवन घालवतात.
जल-कासवांना त्यांचे जलचर स्वरूप थंड हवामानामध्येदेखील जगण्यास मदत करते, असे फेन यांनी सांगितले. ‘ते खोल पाण्यात जाऊ शकतात, जिथे तापमान, विशेषतः हिवाळ्यात, अधिक उष्ण राहते,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘काही जल-कासव त्यांच्या ‘क्लोका’ (cloaca) द्वारे पाण्याखाली श्वास घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना गोठलेल्या पाण्याखाली लपणे सोपे जाते. एकंदरीत, थंड हवामानात जगण्याची त्यांची क्षमता त्यांना जगभरात कोणत्याही ठिकाणी आढळण्यास मदत करते.’