

अथेन्स : प्राचीन ऑलिम्पिकमधील खेळाडू त्यांच्या अफाट शक्ती आणि चपळाईसाठी ओळखले जात असत; पण या ऐतिहासिक खेळांमध्ये महिलांचा सहभाग होता का? नुकत्याच समोर आलेल्या ऐतिहासिक संदर्भांनुसार, प्राचीन ग्रीसमध्ये महिलांना मुख्य ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणे कठीण असले, तरी त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
इसवी सन पूर्व 776 ते इसवी सन 393 या काळात चाललेल्या प्राचीन ऑलिम्पिकमध्ये महिलांसाठीचे नियम अत्यंत कडक होते. दुसर्या शतकातील लेखक पॉसानियस याच्या मते, ऑलिम्पिक स्पर्धा पाहताना पकडल्या जाणार्या कोणत्याही महिलेला कड्यावरून फेकून देण्याचा कायदा अस्तित्वात होता. मुख्य स्पर्धांपासून महिलांना दूर ठेवण्याचा हा एक क्रूर प्रयत्न होता. मुख्य ऑलिम्पिकमध्ये प्रवेश बंदी असली, तरी ग्रीक देवी ‘हिरा’ हिच्या सन्मानार्थ ऑलिम्पियामध्येच महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा भरवल्या जात. याला ‘हिराया’ म्हटले जाई.
ही स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जात असे. यामध्ये केवळ अविवाहित मुलींनाच धावण्याच्या शर्यतीत भाग घेता येत असे. वयोगटानुसार सहभागी मुलींचे तीन विभाग केले जात. विजेत्यांना ‘ऑलिव्ह’च्या पानांचा मुकुट दिला जाई आणि हिरा देवीला अर्पण केलेल्या नैवेद्यातील वाटा मिळत असे. या स्पर्धेतील खेळाडूंचे चित्रण अनेक प्राचीन ग्रीक कलाकृतींवर पाहायला मिळते, ज्यामध्ये त्या गुडघ्यापर्यंतचा झगा (Tunic) परिधान केलेल्या अवस्थेत दिसतात. महिलांना ऑलिम्पिक पाहण्याची किंवा चालवण्याची परवानगी नसली, तरी त्या ‘रथांच्या संघाच्या मालक’ म्हणून स्पर्धेत उतरू शकत होत्या.
स्पार्टाच्या राजाची बहीण ‘कनिसका’ हिने या नियमाचा फायदा घेत इतिहास घडवला. इसवी सन पूर्व 396 मध्ये, कनिसकाच्या रथाच्या संघाने ऑलिम्पिकमध्ये विजय मिळवला. जरी ती स्वतः रथ चालवत नव्हती, तरीही विजयी घोड्यांची मालकीण आणि पैदास करणारी म्हणून तिला अधिकृत विजेती घोषित करण्यात आले. एका प्राचीन पुतळ्यावरील शिलालेखात तिचा उल्लेख ‘संपूर्ण ग्रीसमध्ये ऑलिम्पिक जिंकणारी एकमेव महिला’ असा करण्यात आला आहे. यावरून असे स्पष्ट होते की, प्राचीन काळी सामाजिक बंधने असूनही महिलांनी क्रीडा क्षेत्रात आपली जिद्द आणि अस्तित्व टिकवून ठेवले होते.