

कॅसाब्लांका (मोरोक्को) : मानवाच्या उत्पत्तीचा भूगोल बदलून टाकणारा एक अत्यंत महत्त्वाचा शोध मोरोक्कोमधील एका गुहेत लागला आहे. संशोधकांना येथे 7,73,000 वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडले असून, यामुळे आधुनिक मानवाच्या वंशावळीची सुरुवात आता उत्तर-पश्चिम (वायव्य) आफ्रिकेतून झाल्याचे संकेत मिळत आहेत.
‘नेचर’ या प्रसिद्ध नियतकालिकात बुधवारी (7 जानेवारी) प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात मोरोक्कन आणि फ्रेंच संशोधकांनी काही हाडांच्या अवशेषांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. हे अवशेष आधुनिक मानव (होमो सेपियन्स), निअँडरथल्स आणि डेनिसोव्हन्स या तिन्हींच्या शेवटच्या सामायिक पूर्वजाचे असावेत, असा संशोधकांचा दावा आहे. कॅसाब्लांका येथील ‘थॉमस क्वारी-1’ या ठिकाणच्या ‘ग्रोट ए होमिनीडस्’ नावाच्या गुहेत हे जीवाश्म सापडले आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.
जबड्याचे तीन भाग, पाठीच्या कण्याचे काही मणके आणि अनेक दात. हे अवशेष ‘होमो इरेक्टस’शी साधर्म्य दाखवणारे असले तरी, त्यांचे काही गुणधर्म या पूर्वजापेक्षा वेगळे आणि प्रगत आहेत. गुहेत दगडांची अनेक हत्यारेही सापडली असून, एका पायाच्या हाडावरून असे दिसते की कदाचित या आदिमानवांना तरसांनी शिकार बनवले असावे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्युशनरी अँथ—ोपोलॉजीचे मानववंश शास्त्रज्ञ जीन-जॅक हब्लिन यांनी सांगितले की, ‘हा शोध 10 लाख ते 6 लाख वर्षांपूर्वीच्या आफ्रिकन मानवी जीवाश्मांच्या नोंदींमधील एक मोठी पोकळी भरून काढतो.
‘जनुकीय पुराव्यांवरून असे मानले जात होते की, याच काळात आधुनिक मानव आणि त्यांच्या चुलत प्रजातींचा शेवटचा सामायिक पूर्वज आफ्रिकेत राहत होता. मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या कथा सहसा पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेशी संबंधित असतात. मात्र, गेल्या 10 लाख वर्षांतील मानवी प्रवास हा अत्यंत गुंतागुंतीचा आहे, कारण आपल्या पूर्वजांनी संपूर्ण आफ्रिका आणि युरेशिया खंडात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले होते. हब्लिन आणि त्यांच्या सहकार्यांच्या मते, थॉमस क्वारी येथे सापडलेले जीवाश्म हे आपल्या प्रजातीच्या वंशावळीच्या ‘मुळाचे’ सर्वात प्रबळ दावेदार आहेत.