

लंडन : चार्ल्स डार्विनने एकेकाळी म्हटले होते की, ‘अग्नीचा (आगीचा) शोध ही मानवाने भाषेच्या शोधानंतर लावलेली सर्वात मोठी क्रांती आहे.’ मात्र, नुकत्याच झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासाने या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे स्पष्ट केले आहे. प्राचीन काळात आपले पूर्वज रात्रीच्या वेळी शेकोटीभोवती जमा होऊन जेव्हा गप्पा मारत आणि गोष्टी सांगत, तेव्हाच मानवी भाषेचा (ह्युमन स्पीच) जन्म झाला, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूज’च्या न्यूरोसायंटिस्ट प्रोफेसर कॅथरीन होबायटर आणि डार्टमाऊथ कॉलेजचे मानववंशशास्त्रज्ञ प्रोफेसर नथॅनिएल डोमिनी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभ्यासात शेकोटीच्या प्रकाशाचा मानवी मेंदूवर आणि भाषेच्या विकासावर कसा प्रभाव पडला, याचे थक्क करणारे विश्लेषण करण्यात आले आहे. विश्लेषणातील निष्कर्षही मनोरंजक आणि महत्त्वाचे आहेत.
दिवसाची कामे विरुद्ध रात्रीच्या गोष्टी
चिम्पान्झी किंवा गोरिलांसारखे प्राणी कोणत्याही भाषेविना हावभाव आणि आवाजांद्वारे शिकारीचे नियोजन किंवा दैनंदिन कामे सहज करू शकतात. मानवाचे पूर्वजही दिवसाची व्यावहारिक कामे हावभावांनी उरकत असत. मात्र, शेकोटीच्या शोधानंतर सूर्यास्तानंतरचा ४ तासांचा वेळ मोकळा मिळाला, जिथे कोणत्याही कामाचे दडपण नव्हते. हा वेळ एकत्र येऊन गोष्टी सांगण्यासाठी वापरला गेला.
निळा प्रकाश आणि निद्रानाश
कोणत्याही दिव्याचा प्रकाश डोळ्यांतील ‘मेलाटोनिन’ (झोपेचे संप्रेरक) दाबून ठेवतो. विशेषतः, मोबाईल किंवा स्क्रीनचा ‘ब्ल्यू लाईट’ झोप उडवतो. मात्र, शेकोटीच्या प्रकाशात निळा रंग अजिबात नसतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शेकोटीभोवती बसून गप्पा मारल्या तरी मानवी शरीराची नैसर्गिक स्लीप सायकल बिघडत नाही.
मेंदूचे ट्यूनिंग आणि सहानुभूती
शेकोटीच्या ज्योतींकडे एकत्र पाहिल्याने सर्व लोकांच्या मेंदूतील व्हिज्युअल कॉर्टेक्समधील न्यूरॉन्स एकाच फ्रिक्वेन्सीवर काम करू लागतात. यामुळे लोकांमध्ये एकमेकांबद्दल सहानुभूती, बंधुभाव आणि भावनिक जोड निर्माण झाली, ज्यातून पुढे जटिल भाषेचा पाया रचला गेला.