

वॉशिंग्टन : सुमारे २० लाख ते २ लाख वर्षांपूर्वी आग्नेय आशियातील घनदाट उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये ‘जायगँटोपिथेकस’ (Gigantopithecus) नावाच्या महाकाय नरवानराचा वावर होता. त्या काळात या जंगलांमध्ये नव्याने दाखल झालेल्या मानवाच्या पूर्वजांशी, विशेषतः ‘होमो इरेक्टस’सारख्या मानवाशी (होमिनिन) त्याचा अधिवास विभागला गेला असावा असा अंदाज आहे. (होमिनिन म्हणजे महाकाय नरवानरांपासून उत्क्रांतीचा वेगळा मार्ग निवडल्यानंतर निर्माण झालेल्या आधुनिक मानवाचा, त्यांच्या पूर्वजांचा आणि त्यांच्याशी जवळचे नाते असलेल्या प्रजातींचा समूह.)
शरीराने अतिप्रचंड असला, तरी जायगँटोपिथेकस हा मुख्यत्वे वनस्पती, फळे खाऊन जगणारा शाकाहारी प्राणी होता. त्याचे आधुनिक काळातील ओरँगउटानशी अत्यंत जवळचे नाते मानले जाते. अशा स्थितीत जेव्हा हा महाकाय नरवानर आणि मानवाचे पूर्वज समोरासमोर आले असतील, तेव्हा नेमके काय घडले असावे? या विषयावर तज्ज्ञांनी विविध शक्यता व्यक्त केल्या आहेत. यातील एक शक्यता अशीही आहे की, जायगँटोपिथेकस आणि मानवाचे पूर्वज एकमेकांसमोर आलेच नसतील.
मानवी उत्क्रांतीचा सखोल अभ्यास करणारे पुरातत्वशास्त्रज्ञ आणि ऑस्ट्रेलियातील सदर्न क्रॉस युनिव्हर्सिटीचे संचालक रेनॉड जोआनेस-बोयाउ यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, 'निश्चितपणे काही सांगणे अत्यंत कठीण आहे; कारण जायगँटोपिथेकस आणि मानवाच्या पूर्वजांमधील थेट संवादाचा किंवा संघर्षाचा कोणताही थेट पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही.' पुढे बोलताना जोआनेस-बोयाउ म्हणाले, 'मानवी उत्क्रांतीचा सर्वंकष इतिहास पाहिला, तर मानवाची प्रजाती (होमो) सातत्याने एका सर्वोच्च शिकारी (apex predator) प्रजातीप्रमाणे वावरत आली आहे. मानवाने आणि त्याच्या पूर्वजांनी आपल्या अधिवासात वावरणाऱ्या मोठ्या प्राण्यांचा शोध घेणे, त्यांचा विविध कारणांसाठी वापर करणे आणि काही प्रसंगी त्यांना पूर्णपणे नष्ट करण्याची प्रवृत्ती दाखवून दिली आहे. त्यामुळे त्या काळात परिस्थितीनुसार त्यांच्यात उदासीनता, एकमेकांविषयीचे कुतूहल आणि हिंसा अशा तिन्ही गोष्टींचे मिश्रण पाहायला मिळाले असण्याची दाट शक्यता वाटते.'