Ancient Human Species | चीनमध्ये ‘होमो इरेक्टस’ आणि डेनिसोव्हन्स एकत्र राहिले?

नव्या अभ्यासातून संकेत
Ancient Human Species |
Ancient Human Species | चीनमध्ये ‘होमो इरेक्टस’ आणि डेनिसोव्हन्स एकत्र राहिले?
Published on: 
Updated on: 

बीजिंग : सध्याच्या दक्षिण चीनमधील वर्षावनांमध्ये राहण्याइतका ‘होमो इरेक्टस’ हा मानव अनुकूल ठरला होता आणि तिथे तो डेनिसोव्हन्ससोबत एकत्र राहिला असावा, असे संकेत दोन नवीन अभ्यासांतून मिळाले आहेत. प्राचीन मानवांच्या अत्यंत दुर्मीळ अशा नऊ जीवाश्म दातांवर हे संशोधन आधारित आहे; यामध्ये आठ दात ‘होमो इरेक्टस’चे आणि एक दात ‘होमो’ प्रजातीतील एका गूढ मानवाचा आहे. या दातांवरून हे स्पष्ट होते की ‘होमो इरेक्टस’ चीनमध्ये पूर्वी मानले जात होते त्यापेक्षा खूप अलीकडच्या काळात वास्तव्य करत होता आणि त्या समूहाने तिथले उष्णकटिबंधीय अन्न मोठ्या प्रमाणावर खाल्ले असावे.

‘‘हे मला अत्यंत रोमांचक वाटते, कारण याचा अर्थ तिथल्या वर्षावनांच्या परिस्थितीत एकाच वेळी मानवी पूर्वजांचे (होमिनिन) दोन समूह वास्तव्य करत होते,’’ असे या अभ्यासाचे प्रथम लेखक तथा डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठातील आण्विक जीवाश्म मानववंशशास्त्रज्ञ फ्रिडो वेल्कर यांनी सांगितले. सुमारे २० लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झाल्यानंतर आफ्रिकेतून बाहेर पडणारी पहिली मानवी प्रजाती म्हणून सर्वसाधारणपणे ‘होमो इरेक्टस’कडे पाहिले जाते. ती पूर्व युरेशियामध्ये पसरली आणि सुमारे १६ ते १८ लाख वर्षांपूर्वी चीन व इंडोनेशियापर्यंत पोहोचली.

ही सर्वांत दीर्घकाळ टिकून राहिलेल्या होमिनिन प्रजातींपैकी एक असून, तिची सर्वांत अलीकडची नोंद इंडोनेशियातील जावा बेटावरील नदीच्या पूरमैदानांमध्ये १,०८,००० वर्षांपूर्वीची आहे. मात्र आशियाच्या मुख्य भूमीवर ‘होमो इरेक्टस’ ४,००,००० वर्षांपेक्षा अधिक अलीकडच्या काळात अस्तित्वात असल्याचा कोणताही भौतिक पुरावा यापूर्वी उपलब्ध नव्हता. परंतु दक्षिण चीनमधील ग्वांग्शी प्रांतातील दोन गुहांमध्ये संशोधकांना सस्तन प्राण्यांचे हजारो जीवाश्म सापडले आहेत; हाडे गोळा करणाऱ्या साळींदरांनी ते तिथे साठवले होते. बाक्सियन आणि नॅक्सियन या दोन्ही गुहा सुमारे ९ मैल (१५ किलोमीटर) अंतरावर असून, चुनखडकांच्या झीज होणाऱ्या कार्स्ट भूप्रदेशात वसलेल्या आहेत; अशा गुहा ‘होमो इरेक्टस’साठी महत्त्वाचा निवारा ठरल्या असाव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.