

वॉशिंग्टन : एलियन म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही, हे विज्ञान अद्यापही ठामपणे सांगत नाही. मात्र, ब्रह्मांडाच्या या अनंत पसार्यात केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे, असे म्हणणे हे ‘कूपमंडूक’ वृत्तीचे लक्षण ठरू शकते. जगभरातून अनेक वेळा परग्रहवासीयांचे यान म्हणजेच ‘युफो’ पाहिल्याचे दावे करण्यात आलेले आहेत. एलियन्सबाबत सातत्याने नवे नवे दावे होतच असतात. आता एका नव्या डॉक्युमेंटरीमधून याबाबतचे धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. एलियनसंदर्भात अमेरिकेला माहिती होती, अशी माहिती यामधून समोर आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांना 1964 मध्ये न्यू मेक्सिकोमधील होलोमन एअर फोर्स बेसवर एलियनच्या चकमकीची माहिती होती, असा दावा या माहितीपटात करण्यात आला आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, नवीन डॉक्युमेंटरीमध्ये असा दावा केला गेला आहे की, 1964 मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये एका एलियनचा सामना झाला होता. अमेरिकेतील होलोमन एअर फोर्स बेसवर ही चकमक झाली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश (1989-1993) यांना ही माहिती देण्यात आली. या डॉक्युमेंटरीचे नाव ‘द एज ऑफ डिस्क्लोजर’ असे आहे. या माहितीपटात खगोलभौतिकशास्त्रज्ञ एरिक डेव्हिस यांची एक मुलाखत आहे, ज्यामध्ये ते असे म्हणताना दिसतात की, माजी राष्ट्राध्यक्षांनी त्यांना 2003 मध्ये खासगी संभाषणादरम्यान या घटनेबद्दल सांगितले होते.
एरिक डेव्हिस हे अॅडव्हान्स्ड एरोस्पेस थ्रेट आयडेंटिफिकेशन प्रोग्रामचे सल्लागार होते. रिपोर्टनुसार, बुश यांनी दावा केला होता की, अमेरिकेच्या एअरबेसने तिन्ही स्पेसशिप पाहिल्या होत्या. त्यापैकी एकाने स्पेसशिप उतरवली होती. एलियन्सपैकी एकाने बाहेर येऊन हवाई दल आणि सीआयएच्या एका कर्मचार्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी ओटीटीवर हा माहितीपट प्रदर्शित झाला. यामध्ये परग्रहवासीयांबाबत असे अनेक दावे आणि खुलासे करण्यात आले आहेत. AATIP चे माजी सदस्य हॅल पुथॉफ यांनीही असा दावा केला आहे की, त्यांनी परग्रहवासीयांशी संबंधित बरेच पुरावे जप्त केले आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे संशोधक गॅरी नोलन म्हणतात की, अमेरिकन लष्कराचे जवान हवेतील काही विचित्र घटनांना बळी पडले होते, ज्यामुळे त्यांना खूप दुखापत झाली होती.