

कैरो : धनुष्यबाण आणि खंजिरासारख्या शस्त्रास्त्रांसह दफन करण्यात आलेल्या प्राचीन इजिप्तच्या अनेक राजकन्यांनी त्यांच्या हयातीत या शस्त्रांचा प्रत्यक्ष सराव केला असावा, तसेच त्या शिकार किंवा तिरंदाजीसाठी त्यांचा वापर करत असाव्यात, असा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यामुळे इतिहासकार आणि शास्त्रज्ञांमध्ये एक नवा वाद सुरू झाला आहे.
संशोधकांनी सुमारे ४,००० वर्षांपूर्वी इजिप्तच्या ‘मिडल किंगडम’ काळात होऊन गेलेल्या राजघराण्यातील ६ व्यक्तींच्या अस्थींचे (अवशेषांचे) बारकाईने विश्लेषण केले. या हाडांवरील ज्या ठिकाणी स्नायू जोडलेले असतात, त्या भागांचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, हाडांचे काही विशिष्ट वाढलेले किंवा ठळक झालेले भाग हे तिरंदाजी आणि शस्त्रास्त्रे हाताळण्यासारख्या वारंवार केल्या जाणाऱ्या शारीरिक हालचालींमुळेच विकसित झाले असावेत. ‘‘राजघराण्यातील सदस्य, विशेषतः महिला, तिरंदाजी आणि शिकारीसारख्या कौशल्यपूर्ण व प्रचंड शारीरिक श्रमाच्या क्रियाांमध्ये सक्रियपणे सहभागी असायच्या,’’ अशी माहिती या संशोधनाच्या प्रमुख लेखिका आणि इजिप्तमधील बेनी-सुएफ युनिव्हर्सिटीच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ झैनब हशेश यांनी आपल्या निवेदनात दिली.
शुक्रवार, १७ जुलै रोजी ‘फ्रंटियर्स इन एन्व्हायर्नमेंटल आर्किऑलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. महिलांच्या थडग्यांमध्ये आढळलेली शस्त्रास्त्रे ही केवळ प्रतीकात्मक किंवा धार्मिक विधींचा भाग म्हणून ठेवली होती, या जुन्या समजुतीला या संशोधनाने थेट आव्हान दिले आहे. तसेच यामुळे राजघराण्यातील महिलांचे आरोग्य आणि त्यांच्या शारीरिक हालचालींविषयी नवी माहिती समोर येऊ शकते. दुसरीकडे, या संशोधनात सामील नसलेल्या काही जैव-पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या निष्कर्षांवर आक्षेप घेतला आहे.
त्यांच्या मते, केवळ हाडांमधील बदलांवरून ती व्यक्ती नेमकी कोणती कृती करत होती, याचा खात्रीशीर अंदाज लावता येत नाही. वय, शरीराचा आकार, आनुवंशिकता आणि इतर प्रकारच्या वारंवार होणाऱ्या शारीरिक हालचालींमुळेही हाडांवर अशाच प्रकारचे बदल घडून येऊ शकतात. १८९० च्या दशकात फ्रेंच पुरातत्त्वशास्त्रज्ञ जॅक डी मॉर्गन यांनी इजिप्तचे फेरो (राजे) अमेनेमहत दुसरे आणि अमेनेमहत तिसरे यांच्या थडग्यांजवळ एका ठिकाणाचे उत्खनन केले होते. या उत्खननादरम्यान डी मॉर्गन यांना राजघराण्यातील विविध व्यक्तींचे अर्धवट अवशेष सापडले होते, जे नंतर कैरो येथील इजिप्शियन संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले होते. याच अवशेषांवर आता हे नवे संशोधन करण्यात आले आहे.