आंध्र प्रदेशात शेतातून चक्क ‘हिर्‍यांची कापणी’!

पावसाळ्यात शेतात सापडतात लाखो-कोटींचे हिरे
diamonds-found-in-fields-during-monsoon-season
आंध्र प्रदेशात शेतातून चक्क ‘हिर्‍यांची कापणी’!Pudhari File Photo
Published on
Updated on

अमरावती : ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती...’ हे 58 वर्ष जुनं देशभक्तीपर गीत ऐकताना आपण कल्पनेच्या विश्वात रमून जातो. पण, आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि कर्नूल जिल्ह्यांमध्ये ही कल्पना सत्यात उतरली आहे. या भागातील लोक दरवर्षी पावसाळ्यात अक्षरशः ‘हिर्‍यांची कापणी’ करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, वज्रकरूर, जोन्नागिरी, तुग्गली आणि मद्दीकेरा यांसारख्या भागांमध्ये लोक सकाळीच घरातली साधी लाकडी अवजारे, चाळणी आणि डाव घेऊन आपलं नशीब आजमावण्यासाठी बाहेर पडतात. नशिबाने साथ दिली, तर कुणाला 1-2 लाखांचा हिरा मिळतो, तर कधी कुणाची 50 लाखांची लॉटरी लागते.

एका वृत्तानुसार, प्रत्येक पावसाळ्यात मद्दीकेरा आणि तुग्गली या तालुक्यांमध्ये सुमारे 5 कोटी रुपयांचे हिरे सापडतात. पूर्वी शेतात काम करताना शेतकर्‍यांना कधीतरी एखादा हिर्‍याचा तुकडा सापडायचा. पण, गेल्या दशकभरात हिरे शोधणे हा एक ट्रेंडच बनला आहे. आता पावसाळा सुरू होताच तेलंगणा, कर्नाटकसह दूरदूरवरून लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी अनंतपूर आणि कर्नूलमध्ये दाखल होतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब पावसाळा संपेपर्यंत इथे तळ ठोकून हिर्‍यांचा शोध घेतात. याच काळात हिर्‍यांचे खरेदीदारही सक्रिय होतात आणि इथे सापडलेला हिरा मुंबई आणि सुरतच्या बाजारपेठेत पोहोचायला वेळ लागत नाही.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणासह अनेक संस्थांनी आंध्र प्रदेशातील हा भाग ‘हिर्‍यांचा हॉटस्पॉट’ म्हणून घोषित केला आहे. याचा फायदा स्थानिकांना झाला, पण दुसरीकडे शेतकरी मात्र त्रस्त झाले आहेत. दूरवरून येणारे लोक हिर्‍यांच्या लालसेने शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे नुकसान करत आहेत. नुकतीच पेरणी झालेली पिके त्यांच्या पायाखाली तुडवली जातात. जेव्हा एखाद्याला हिरा सापडतो, तेव्हा ही बातमी वार्‍यासारखी संपूर्ण परिसरात पसरते आणि त्यानंतर हिरे शोधणार्‍यांची गर्दी आणखी वाढते. जून आणि जुलैमध्ये पहिला पाऊस पडतो, तेव्हा जमिनीचा वरचा थर वाहून जातो.

यामुळे जमिनीत दबलेले हिरे वर येतात आणि सहज दिसू लागतात. हे हिरे काढण्यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही. मे 2019 मध्ये जोन्नागिरीत एका मजुराला शेतात काम करताना 14 लाख रुपयांचा हिरा सापडला. त्याच वर्षी पेरावली गावात एका शेतकर्‍याला 2 लाख रुपयांचा हिरा मिळाला. केवळ तीन दिवसांत या भागातील लोकांनी 10 लाखांचे हिरे शोधले होते. 2021 मध्ये जोन्नागिरीतील दोन मजुरांनी आपले हिरे अनुक्रमे 70 लाख आणि 50 लाख रुपयांना विकले. कासिम नावाच्या एका ड्रायव्हरला तर आपल्या शेतात तब्बल 1.2 कोटी रुपयांचा हिरा सापडला होता. गेल्या वर्षी तुग्गली आणि मद्दीकेरामध्ये सापडलेल्या चार हिर्‍यांची एकूण किंमत 70 लाख रुपये होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news