लंडन :
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील बहुतेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला. मात्र, याच लॉकडाऊनमुळे लोकांना नैराश्य, भीती आणि एकाकीपणाचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातील निष्कर्षानुसार लॉकडाऊनचा सर्वात जास्त प्रभाव युवतींवर दिसून आला. लॉकडाऊनमुळे इतरांच्या तुलनेत युवतींमध्ये नैराश्य, भीती आणि एकाकीपणा जास्त दिसून आला.
'युनिव्हर्सिटी ऑफ लंडन'च्या संशोधकांनी यासंदर्भात नुकताच एक सर्व्हे केला. यामध्ये सुमारे 18 हजार जणांना सहभागी करवून घेण्यात आले होते. लॉकडाऊनला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर म्हणजे गेल्या मे महिन्यात हा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये असे दिसून आले की, लॉकडाऊनमुळे 19 वर्षे व त्याहून जास्त वयाच्या लोकांचे मानसिक आरोग्य जास्त प्रभावित झाले होते. सहभागी लोकांमधील 37 टक्के युवती आणि 25 टक्के युवकांमध्ये नैराश्याची लक्षणे दिसून आली; तर 30 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये मानसिक आजाराची जास्त लक्षणे दिसून आली. या वयोगटातील पाचपैकी एका महिलेत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत नैराश्याची समस्या दुप्पट बळावल्याचे दिसून आले. हे संशोधन तब्बल चार पिढ्यांवर केले आहे. यामध्ये 62 वर्षे, 50 वर्षे, 30 व 19 वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश होता. लॉकडाऊनमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांमधील मानसिक समस्या बळावल्याचे निष्पन्न झाले.