Denisovans | ‘डेनिसोव्हन’ या आपल्या नामशेष पूर्वजांचे रूप होते अतिशय वेगळे

नव्या संशोधनातून मोठे वास्तव उघड
Denisovans | ‘
Denisovans | ‘डेनिसोव्हन’ या आपल्या नामशेष पूर्वजांचे रूप होते अतिशय वेगळे
Published on: 
Updated on: 

बीजिंग : आपले नामशेष झालेले पूर्वज मानल्या जाणाऱ्या ‘डेनिसोव्हन’ या प्राचीन मानवाचे रूप अतिशय आगळेवेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण होते, अशी रंजक माहिती एका नव्या अभ्यासातून समोर आली आहे. प्राचीन प्रथिने आणि जीवाश्मांच्या अभ्यासावर आधारित या संशोधनानुसार, डेनिसोव्हन मानवामध्ये निअँडरथल, आधुनिक मानव आणि होमो इरेक्टस यांची काही लक्षणे सामायिक होती. असे असले तरी त्यांच्या कवटीची रचना आणि जनुकीय गुणधर्म हे अतिशय वेगळे होते. याच वैशिष्ट्यांमुळे संशोधकांना एका डेनिसोव्हन पुरुषाचा नवा चेहरा रेखाटण्यात यश आले आहे.

प्रसिद्ध ‘नेचर’ नियतकालिकात २१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात, उत्तर चीनमधील ‘सुजियायाओ’ (Xujiayao) या पुरातत्त्‍वस्थळावर सापडलेल्या डेनिसोव्हन मानवाच्या कवट्यांचे विश्लेषण करण्यात आले. डेनिसोव्हन ही आशिया खंडात राहणारी प्राचीन मानवी प्रजाती असून, साधारणत: ३०,००० वर्षांपूर्वी ती नामशेष झाली. २०१० मध्ये सैबेरियातील एका गुहेत सापडलेल्या बोटाच्या हाडाच्या ‘डीएनए’वरून या प्रजातीची प्रथम ओळख पटली होती. ‘सुजियायाओ’ येथे १९७० च्या दशकाच्या शेवटी हाडे आणि दात उत्खननात सापडले होते. त्यावेळी वैज्ञानिकांना डेनिसोव्हन प्रजातीबद्दल कोणतीही माहिती नव्हती.

हे अवशेष सुमारे १ लाख ३८ हजार ते १ लाख ९९ हजार वर्षांपूर्वीचे असल्याने, सुरुवातीला ते निअँडरथल किंवा अर्वाचीन होमो सॅपियन्सचे असावेत, असा अंदाज बांधला गेला होता. मात्र, अलीकडच्या काळात ‘पॅलिओप्रोटिओमिक्स’ (Paleoproteomics - हाडे व दातांमधील प्रथिनांचा अभ्यास, जे ‘डीएनए’पेक्षा अधिक काळ टिकतात) या तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे संशोधकांना इतर प्राचीन मानवी समूहांपासून डेनिसोव्हन मानवाला वेगळे ओळखणे शक्य झाले आहे. या नव्या अभ्यासात संशोधकांनी सुजियायाओ येथील २० अवशेषांचे ‘पॅलिओप्रोटिओमिक’ विश्लेषण केले. यात हे सर्व अवशेष डेनिसोव्हन प्रजातीचेच असल्याचे स्पष्ट झाले. या शोधामुळे संशोधकांना कवट्यांच्या हाडांचा सखोल अभ्यास करून डेनिसोव्हन मानव नक्की कसा दिसत असावा, याचा अचूक अंदाज लावता आला आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सुजियायाओ’ येथे सापडलेल्या कवट्यांमध्ये ‘होमो इरेक्टस’प्रमाणे सखोल व रुंद मेंदूची खोपडी आणि कवटीची जाड हाडे यासारखी काही वैशिष्ट्ये आढळली. परंतु, त्यांच्यात निअँडरथल आणि आधुनिक मानवाशी जुळणारी शारीरिक वैशिष्ट्येही होती; विशेषतः त्यांच्या उपदाढांमध्ये. यासोबतच संशोधकांनी डेनिसोव्हनच्या कवटीची काही अनोखी वैशिष्ट्येही शोधून काढली आहेत. उदाहरणार्थ, त्यांच्या कवटीचा मागचा भाग निअँडरथल किंवा आधुनिक मानवाच्या तुलनेत अधिक उभा आणि कमी गोलाकार होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.